नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशातही 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगनात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आम्ही 40 दिवस पाच राज्यांचा दौरा केला. राजकीय पक्ष, केंद्र आणि राज्य सरकारांशी चर्चा केली, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. या पाच राज्यात विधानसभेच्या 679 जागा आहेत. या पाचही राज्यात 16.14 कोटी मतदार आहेत. यात 8.2 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला आणि 60.2 लाख नवोदित मतदार आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच अपंग मतदार, ज्येष्ठ नागरिक आदींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.
आदिवासींसाठी मतदानाची खास व्यवस्था करण्यता आली आहे. नागरिकांनी मतदानात मोठ्या संख्यने भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच राजकीय पक्षांनी 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मिळणाऱ्या निधीची यादी द्यावी, अशा सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. निधीची माहिती मिळाल्यावरच टॅक्समध्ये सूट देण्यात येईल. तसेच निवडणूक काळातील खर्चाचा तपशील देणं सर्वच उमेदवारांवर बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा
राजस्थानमध्ये एकूण 200 जागा आहेत
छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत
तेलंगनात ११९ जागा आहेत.
मिझोरामध्ये 40 जागा आहेत.
मध्यप्रदेश
मतदान- 17 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
राजस्थान
मतदान- 23 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
छत्तीसगड
मतदान- 7 आणि 17 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
तेलंगाना
मतदान- 30 नोव्हेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
मिझोराम
मतदान- 7 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर