देशात 16 एप्रिलला लोकसभेचं मतदान होणार? निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे खळबळ

| Updated on: Jan 23, 2024 | 7:52 PM

निवडणूक आयोगाच्या एका पत्रामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या पत्रानुसार आगामी लोकसभा निवडणुका या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. संबंधित पत्राची देशभरात चर्चा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या पत्रावर स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात 16 एप्रिलला लोकसभेचं मतदान होणार? निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे खळबळ
Follow us on

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 23 जानेवारी 2024 : निवडणूक आयोगाच्या एका पत्रामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या पत्रानुसार आगामी लोकसभा निवडणुका या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या व्हायरल झालेल्या पत्रात 16 एप्रिलला लोकसभेसाठी देशभरात मतदान होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणुकीसाठीचं मतदान खरंच येत्या 16 एप्रिलला होईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. प्रशासनाच्या तयारीसाठी अंदाजे 16 एप्रिल ही तारीख निवडल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाचं संबंधित पत्र व्हायरल झाल्यानंतर देशात खरंच 16 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार का? असा प्रश्न उपस्थित होतंय. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. देशात 16 एप्रिलला मतदान होणार नाही, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने ट्विटमध्ये नेमकं स्पष्टीकरण काय दिलंय?

“दिल्ली निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात मीडियाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 16 एप्रिल 2024 ही लोकसभा निवडणुकीची संभाव्य तारीख आहे का? असे विचारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आराखड्यानुसार अधिकाऱ्यांनी उपक्रम आखण्यासाठी ही तारीख केवळ ‘संदर्भा’साठी नमूद केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे”, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने ट्विटमध्ये दिलं आहे.

व्हायरल होणाऱ्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

संबंधित पत्र हे दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडून दिल्लीच्या सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. “भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेल्या निवडणूक नियोजकाकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मला निर्देश देण्यात आला आहे ज्यामध्ये निवडणुकीपर्यंतच्या विविध उपक्रमांसोबत प्रत्येक क्रियाकलाप सुरू होण्यासाठी आणि होण्यासाठी कालावधी/कालावधी देण्यात आल्या आहेत. पूर्ण. लोकसभा 2024 च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी, आयोगाने संदर्भासाठी आणि निवडणूक नियोजकामध्ये प्रारंभ आणि समाप्ती तारखांची गणना करण्यासाठी मतदानाचा दिवस तात्पुरता 16.04.2024 हा दिला आहे”, असं पत्रात म्हटलं आहे.

“तुम्हाला हे देखील कळविण्यात येते की, प्रत्येक निवडणूक क्रियाकलाप प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखेला, निवडणूक नियोजक पोर्टलवरून सीईओ दिल्ली यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे सूचना पाठविली जाते. सीईओ (मुख्यालय) येथे डीईओएस/आरओएस आणि संबंधित शाखांकडून प्राप्त झालेल्या अहवालांवर अवलंबून प्रत्येक क्रियाकलापाची स्थिती प्रलंबित / प्रगतीपथावर / अनुसूचित / पूर्ण म्हणून अद्यतनित / चिन्हांकित करणे आवश्यक आहे”, अशी सूचना या पत्रात देण्यात आली आहे.

“या संदर्भात, निवडणूक नियोजकात नमूद केलेल्या प्रत्येक निवडणुकीचा क्रियाकलाप करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेचे पालन करावे आणि coebranch2024@gmail.com या ईमेल आयडीवर सीओई शाखा, सीईओ कार्यालय, दिल्ली येथे पाठवा. निवडणुकीच्या क्रियाकलाप प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखांच्या किमान एक दिवस आधी”, असं या पत्रात म्हटलं आहे.