नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (President of India election) कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे कोविंद यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची संधी मिळणार की इतर कुणाला राष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळी आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच एखादी महिलाही देशाची आगामी राष्ट्रपती असू शकते असंही सांगितलं जात आहे. तर, भाजपच्या एकूण राजकीय रणनीतीनुसार राष्ट्रपतीपदासाठी अनपेक्षित नावही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Election Commission of India to announce the schedule for election for the next President of India at 1500 hours today.
— ANI (@ANI) June 9, 2022
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार असल्याचं सांगितलं आहे. आज दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार असल्याचं आयोगानं म्हटलं. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या हॉल नंबर 5 मध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. प्रत्येक मीडियातील केवळ एकाच टीमला पत्रकार परिषदेत उपस्थित राहता येणार आहे. अडीच वाजल्यापासून हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्वांना कोविड नियम पाळणं बंधनकारक असून अंतर राखून बसण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017मध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या राष्ट्रपतीपदाची शोधाशोध सुरू आहे.
राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या चार नावे आहेत. विशेष म्हणजे या सर्व चारही महिला आहेत. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांची नावे राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत आहेत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद हे आजपर्यंत आदिवासी महिलेनं भूषविलेलं नाही. त्यामुळे मुर्मू आणि उईके या दोन आदिवासी महिलांपैकी एकीला राष्ट्रपतीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी भाजप कुणाचं नाव पुढे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.