बंगळूर : देशात दर काही महिन्यांनी निवडणुकीचे वातावरण असते. कुठे तरी निवडणुका होणार असतात. मग त्या ठिकाणी मतदार हा राजा असतो. मग या राजाला संमोहीत करण्यासाठी मदिरा, भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली जाते. ही उलाढाल कोट्यवधी शब्दही कमी पडले, इतकी मोठी असते. कारण निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य जप्त केल्याची बातमी आली आहे. म्हणजे ही सापडलेली रक्कम आहे. न सापडणारी अशी कितीतरी प्रकरणे असतील.
कुठे सुरु आहे रणधुमाळी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष व्यस्त आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दुसरीकडे ६ एप्रिल रोजी राज्यातील निपाणी, भद्रावती, गदग आणि नरगुंड परिसरातून ४.४५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 29 मार्च 2023 रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे केवळ आठ दिवसांत कर्नाटक राज्यात किमान 69.36 कोटी रुपये रोख रक्कम, दारू आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
कशी आहे रक्कम
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जप्त केलेल्या रकमेत 22.75 कोटी रुपये रोख आहेत. 24.45 कोटी रुपयांची दारु आहे. मतदारांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची किंमत 12 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या साहित्यात रोख रक्कम, दारू, भेटवस्तूंसोबत ड्रग्जसुद्धा आहे. एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांचा समावेश आहे.
526 एफआयआर
धारवाड मतदारसंघातून सुमारे 45 लाख रुपये किमतीचे 725 ग्रॅम सोने जप्त केले, तर फ्लाइंग स्क्वॉड टीमने बेंगळुरू शहरातील एका मतदारसंघातून 34 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोफत वस्तू जप्त केल्या. दुसरीकडे, 6 एप्रिल रोजीच बेलागावच्या खानापूर तालुका परिसरातून 4.61 कोटी रुपये रोख आणि 395 ग्रॅम सोने (21.25 कोटी) जप्त करण्यात आले आहे. जप्तीप्रकरणी आतापर्यंत एकूण 526 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
काँग्रेस वाटणार गँरंटी कार्ड
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस गँरंटी कार्डचे वाटप करणार आहे. काँग्रेस या कार्डमध्ये लोकांना मोफत वीज आणि महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन देत आहे. साहजिकच काँग्रेस कर्नाटकात मोफत रेवड्याच्या राजकारणावर काँग्रेस काम करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या रेवड्या चालल्या नव्हत्या.
कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेला तीन आश्वासने दिली आहेत.