Election Commission : मिनी लोकसभेचा रणसंग्राम आजपासून… ‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार

| Updated on: Oct 09, 2023 | 8:26 AM

केंद्रीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुका म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांची कसोटी लागणार आहे.

Election Commission : मिनी लोकसभेचा रणसंग्राम आजपासून... या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार
election commission of india
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 9 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुकांचा बार आज उडणार आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आजच या पाचही राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. या पाच राज्यांच्या निवडणुका इंडिया आघाडी आणि एनडीएसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकीतून देशाचा कल कुठल्या बाजूने आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे.

आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश, आणि छत्तीसगडसहीत या पाचही राज्यातील विधानसभा निवडणुका म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानलं जात आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तर मध्यप्रदेशात भाजपची सत्ता आहे. तेलंगनात बीआरएस आणि मिझोराममध्ये एमएनएफ या प्रादेशिक पक्षाचं सरकार आहे.

किती टप्प्यात मतदान?

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. 10 ते 15 डिसेंबरपर्यंत या पाचही राज्यात मतदान होऊ शकेल, असं सांगितलं जात आहे.

2018 ला काय झालं?

2018मध्ये निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजीच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यावेळी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं होतं. मध्यप्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगनात एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 18 विधानसभा जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झालं होतं.

तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांवर मतदान झालं होतं. 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. तर मध्यप्रदेश आणि मिझोरामध्ये 28 नोव्हेंबर आणि राजस्थान आणि तेलंगनात 7 डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. या पाचही राज्यात 11 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी झाली होती.

कुणाचं किती बळ

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. यात भाजपकडे 128 आणि काँग्रेसकडे 98 जागा आहेत. तर बसपाचा एक आमदार आहे. तीन अपक्ष आहेत. राजस्थानमध्ये एकूण 200 जागा आहेत. त्यात काँग्रेसचे 108, भाजपचे 70, आरएलडीचा एक, आरएलएसपीचे 3, बीटीपी आणि डाव्यापक्षाचे प्रत्येकी दोन आणि 13 अपक्ष आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये 90 जागा असून त्यात काँग्रेसचे 71, भाजपचे 15, बसपाचे दोन आणि जेजेएसचा एक आमदार आहे.