माले : मालदीवमध्ये आगामी संसदीय निवडणुकांसाठी मतपेट्या भारतात देखील आल्या आहेत. याशिवाय श्रीलंका आणि मलेशियामध्येही या मतपेट्या ठेवल्या जाणार आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने रविवारी ही माहिती दिली की 11,000 मालदीववासीयांनी त्यांची मतदान केंद्रे हलवण्यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लोकांना 21 एप्रिल रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकीसाठी नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांची मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यासाठी दिलेला सहा दिवसांचा कालावधी शनिवारी संपला आहे.
आयोगाने सांगितले की, मालदीव निवडणुकीसाठी मतपेट्या केरळची राजधानी तिरुअनंतपुरम, श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि मलेशियाचे क्वालालंपूर येथे ठेवल्या जातील कारण तिन्ही देशांतील प्रत्येकी किमान 150 लोकांनी मतदानासाठी पुन्हा नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाचे महासचिव हसन झकारिया म्हणाले की, श्रीलंका आणि मलेशियामध्येही अनेकांनी नोंदणी केली आहे. भारतातील तिरुअनंतपुरममध्ये 150 लोकांनी नोंदणी केली आहे, म्हणून तेथे मतपेटी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत विविध मतदान केंद्रांवर पुनर्नोंदणीची विनंती करणारे ११,१६९ अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले. आयोगाने 1,141 फॉर्म नाकारले आणि नोंदणीसाठी एकूण अर्जांची संख्या 10,028 झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे नमूद करून झकारिया म्हणाले की, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि थायलंडमध्ये मतदान होणार नाही.
मालदीवमध्ये रविवारी संसदीय निवडणुका होणार होत्या, पण रमजान महिन्यात निवडणुका होऊ नयेत यासाठी कायद्यात सुधारणा केल्यानंतर निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता २१ एप्रिलला लोकसभा निवडणुका होणार आहेत. मालदीवमध्ये एकूण 93 लोकसभा जागांसाठी एकूण 389 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सर्वाधिक उमेदवार हे भारत समर्थक विरोधी पक्ष असलेल्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) आहेत – जे 90 जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यापाठोपाठ प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) आणि पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) यांची सत्ताधारी आघाडी आहे, जी 89 जागांवर लढत आहेत. चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू गेल्या वर्षी भारतविरोधी भूमिका घेऊन सत्तेवर आले होते.