अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमध्ये नेणार आहे. निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी आणि आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात उशीर झाला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही केवळ निर्णय न घेतल्याने भाजपने सत्ता स्थापन करून बाजी मारली होती. त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच काँग्रेसच्या या निर्णयामुळे गुजरातमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार की नाही? या चर्चांना उधाण आलं आहे.
गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस भाजपच्या सत्तेला सुरुंग लावणार की भाजप पुन्हा सत्ता राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आम आदमी पार्टी गुजरातमध्ये काय चमत्कार घडवणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचं चित्रं दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. विजयी उमेदवारांना विजयाचं प्रमाणपत्रं मिळताच काँग्रेस या सर्व आमदारांना राजस्थानमध्ये घेऊन जाणार आहे. आमदार फोडले जाऊ नयेत म्हणून काँग्रेस ही खबरदारी घेणार आहे. तसेच राज्यातील परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेणार आहे.
टीव्ही9ने घेतलेल्या एक्झिट पोलनुसार आपला गुजरातमध्ये केवळ 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या जागाही यावेळी कमी होणरा आहेत. एक्झिटपोलनुसार काँग्रेसला यावेळी 40 ते 50 जागा मिळणार आहेत. तर भाजपला 125 ते 130 जागा मिळणार आहे. म्हणजे भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने विजयी होणार असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.