नवी दिल्ली : लाखो लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. इशा फाऊंडेशनने बुधवारी ही माहिती दिली. सदगुरु जग्गी वासुदेव यांची ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. इशा फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या आरोग्यात आता सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. “आरोग्याच्या कारणांमुळे सदगुरुंच्या जीवीताला नुकताच गंभीर धोका निर्माण झाला होता. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे” असं इशा फाऊंडेशनने म्हटलं आहे. स्टेटमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्चला सदगुरुंच MRI स्कॅन करण्यात आलं. त्यात त्यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याच दिसलं.
त्यानंतरही सदगुरु जग्गी वासुदेव यांनी आपलेला ठरलेला कार्यक्रम रद्द केला नाही. जो शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. औषध घेऊन ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सदगुरुंना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. तब्येत आणखी बिघडल्यानंतर 17 मार्चला तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
कधी पासून सुरु होता त्रास?
मागच्या चार आठवड्यांपासून सदगुरुंना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. 14 मार्च 2024 रोजी दिल्लीत दाखल झाल्यानंतर हा डोकेदुखीचा त्रास प्रचंड वाढला. त्याचदिवशी संध्याकाळी 4.30 वाजता MRI स्कॅन करण्यात आलं. त्यातून मेंदूत रक्तस्त्राव सुरु असल्याच समजलं. प्रकृती बिघडत होती, तरीही सदगुरुंनी ठरवलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय का घेतला?
17 मार्च 2024 रोजी सदगुरुंची प्रकृती आणखी बिघडली. डाव्या पायातील शक्ती कमी झाली. प्रचंड डोकेदुखी सुरु होती. उलटी झाली. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. विनीत सुरी यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. सदगुरुंच्या प्रकृतीत आता सुधारणा दिसून आलीय. मेंदू, शरीर आणि अन्य अवयव यांच्यात सुधारणा झाली आहे.