Ayodhya : अयोध्येत रामलल्ल विराजमान झाल्यानंतर राम मंदिरात दररोज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. देशभरातूनच नाही तर जगभरातून रामभक्त अयोध्येत येत आहेत. रामललाचे दर्शन घेऊन ते रामलल्लाला मनापासून दानही करत आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले की, दररोज तीन लाख लोक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. २२ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांची संख्या २८ लाखांच्या पुढे गेली आहे. इतकंच नाही तर रामल्लासाठी भाविकांनी मोठ्या मनाने दान देखील दिले आहे. दररोज मोठ्या देणग्या दानाच्या रुपात येत आहेत. रामभक्त रोख आणि धनादेशाद्वारे दान करत आहेत. राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी तासनतास भाविक रांगेत उभे राहत आहेत. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर गेल्या 11 दिवसांत 20 कोटी रुपयांची देणगी भक्तांकडून आली आहे. केवळ रोख रकमेतूनच नाही तर मौल्यवान वस्तू देखील दान केले जात आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, प्रभू राम विराजमान झाल्यापासून सुमारे २८ लाख राम भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले असून 20 कोटींहून अधिक रक्कम दान म्हणून आली आहे.
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात चार ठिकाणी मोठ्या मोठ्या दानपेटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भक्त दान करत आहेत. इतकंच नाही तर दिवसातून किमान दोन वेळा या दानपेट्या रिकामी कराव्या लागत आहेत. मंदिरात येणारी देणगी मोजण्यासाठी बँकेचे 11 कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे 3 कर्मचारी ठेवण्यात आले आहे. दररोज ही रक्कम मंदिरात जमा केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली रक्कम मोजली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होत आहे. 22 जानेवारीलाच राम मंदिरात 3.17 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.