भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख झाली आहे. क्रिकेटच्या या लोकप्रियतेचा गैरफायदा अनेक जण घेऊ लागले आहेत. त्यात सट्टेबाजीसारखा अपप्रकार सरार्स होऊ लागले आहेत. आता कसोटी क्रिकेट असो की वनडे सामने, टी २० सामने असो की आयपीएल सामने त्यात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होऊ लागली आहे. ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात एका अभियंत्याने 1.5 कोटी रुपये गमावले. सट्टेबाजीसाठी त्याने अनेक जणांकडून पैसे घेतले होते. त्या लोकांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्याच्या पत्नीने जीवन संपवले. कर्नाटकामधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या दर्शन बालू नावाच्या या सहायक अभियंत्यासोबत हा प्रकार घडला.
झटपट श्रीमंत होण्यासाठी दर्शन बालू यांनी क्रिकेट सट्टेबाजीचा पर्याय निवडला. स्वत:कडे असलेले पैसे क्रिकेटच्या सट्टेबाजीत उडवले. ते पैसे संपल्यावर लोकांकडून उधार पैसे घेतले. ते पैसे सट्टेबाजीत घालवले. यामुळे लोकांना तो पैसे परत देऊ शकला नाही. यामुळे ती लोक घरी येऊन धमक्या देऊ लागले. या प्रकारामुळे दर्शन बालू यांची पत्नी रंजीता हिने आत्महत्या केली.
24 वर्षीय रंजीताने चिठ्ठी लिहून काही लोकांवर आरोप केले. दर्शन याने ज्या लोकांकडून पैसे घेतले होते, ती लोक घरी येऊन धमक्या देऊ लागले. रंजीता हिलाही ती लोक त्रास देऊ लागले. यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रंजीताने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी शिवू, गिरीश आणि वेंकटेश या तिन जणांना अटक करण्यात आली आहे. दर्शन आणि रंजीता यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शन याने 1.5 कोटी कर्जापैकी अनेक लोकांचे पैसे परत दिले होते. आता फक्त 54 लाख रुपये राहिले होते. दर्शन याच्या सासऱ्याने म्हटले की, तो क्रिकेटवर सट्टेबाजीसाठी तयार नव्हता. परंतु कर्ज देणाऱ्या लोकांनी त्याला लालच देऊन या प्रकरणात फसवले.