रायपूर – बांग्लादेशचे एक विमान (Bangladeshi plane)गेल्या सात वर्षांपासून रायपूरच्या विमानतळावर (Raipur Airport)उभे आहे. ढाक्यावरुन मस्कतला जात असलेल्या या विमानाचे सात वर्षांपूर्वी रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात (emergency landing)आले होते. विमानतळाचे संचालक तीनदा बदलले तरीही हे विमान अजून रायपूरवरुन बांग्लादेशला रवाना होऊ शकलेले नाही. या विमानाची किंमत एकूण १८० कोटी आहे, तर गेल्या सात वर्षांपासूनचे पार्किंग चार्जेस हे २.२५ कोटी रुपये इतके आहेत. वारंवार बांग्लादेशशी संपर्क करुनही हे विमान अजूनही रायपूरवरुन बांग्लादेशात नेण्यात आलेले नाही. त्यामुळे अखेरीस या विमानाचा लिलाव करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या विमानाच्या पार्किंगच्या भाड्याबाबत थेट परराष्ट्र मंत्रालय पाठपुरावा करते आहे. २ डझनांहून अधिक ई मेल्स पाठवल्यानंतर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या दबावानंतर, परदेशी एयरलाईन्सने विमान विकून पार्किंगचे पैसे फेडू असे आश्वासन दिले आहे. रायपूर एयरपोर्ट प्रशासनाला विमान विकल्यानंतर पार्किंगचे पैसे आणि इतर शुल्क देण्यात येणार आहे. या विमानाच्या विक्रीसाठी आता लवकरच ऑनलाईन जगतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यानंतर विकत घेणारे हे विमान रायपूरवरुन नेणार आहेत.
७ ऑगस्ट २०१५ साली ढाक्यावरुन मस्कतला हे विमान चालले होते. त्यावेळी विमानाचे इंजिन फेल झाले. यात १७३ प्रवासी होते. रायपूरपासून ९० किलोमीटरवर बेमेतरा येथे इंजिनच्या एका भागाला आग लागलून तो भाग शेतांमध्ये पडला. त्यानंतर पायलटने रायपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. तेव्हापासून हे विमान रायपूर विमानतळावरच उभे आहे. या विमनाचे इंजिनही बदलण्यात आले आहे. इतके करुनही विमान माघारी नेण्यात आलेले नाही. विमानतळ प्रशासनाकडून सातत्याने आठवणेची मेल पाठवण्यात येत होते, मात्र त्यांना कोणतेही उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. तेव्हा संबंधित विमान कंपनीने विमान विकून पैसे फेडण्याचे आश्वासन दिले आहे.
बांग्लादेशातील युनायटेड एयरवेज कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने विमान विकत असल्याची माहिती दिली आहे. गेल्या सात वर्षांत या विमानाच्या पार्किंगसह इतर शुल्क धरुन २.२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. बाजारात या नव्या विमानाची किंमत १८० कोटींहून अधिक आहे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक किमतीत हे विकले जाईल, अशी शक्यता आहे. विमान विकल्यानंतरच रायपूर विमानतळाला पार्किंग शुल्क मिळणार आहे.