बेंगळुरू : दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक विधानसभेचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार येत्या 10 मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात काय होणार? कुणाची सत्ता येणार? याकडे आता सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. शिवाय कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच शनिवार किंवा रविवार ऐवजी बुधवारी मतदान होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुधवारीच मतदान का घेतलं? याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची तारीख जाहीर केली. बुधवारी मतदान घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी निवडणूक घेण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी निवडणूक घेतली जाते तिथे सुट्टी जाहीर केली जाते. सरकारी कर्मचारी असो किंवा खासगी कंपनीतील कर्मचारी सर्वांना सुट्टी मिळते. मात्र, शनिवार किंवा रविवारी सुट्टी जाहीर केल्याने विकेंडच्या दिवशी लोक सुट्टी असल्याने फिरायला जातात. सरकारी कर्मचारी आणि खासगी कर्मचारीही फिरायला जातात. त्यामुळे मतांचा टक्का घसरतो. जास्तीत जास्त लोकांनी मतदानात भाग घ्यावा म्हणून त्यांना सुट्टी दिली जाते. पण लोक फिरायला जाते. त्यामुळेच मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे म्हणून बुधवारी मतदान ठेवलं आहे, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे एवढं मोठं राज्य हातातून जावं असं भाजपला वाटणार नाही. त्यामुळेच भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचं रान करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसलाही सत्तेत जाणं सोपं होणार नाही. काँग्रेसलाही सत्तेत जाण्यासाठी सर्वस्वपणाला लावावं लागणार आहे.
काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. तर सिद्धारमैया यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. त्यामुळे ते शिवकुमार यांना या पदापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत या दोन्ही नेत्यांमधील ठसन पाहायला मिळाली होती. दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपआपलं शक्तीप्रदर्शन केलं होतं. काँग्रेसमध्ये जशा अंतर्गत लाथाळ्या आहेत, तशीच धुसफूस भाजपमध्येही आहे. भाजपची सर्व मदार दुखावल्या गेलेल्या येडियुरप्पा यांच्यावर आहे. त्यामुळे येडियुरप्पा काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.