नवी दिल्ली: कृषी कायद्यासाठी दिल्लीत आंदोलन करून केंद्र सरकारला जेरीस आणणारे शेतकरी आता निवडणुकीच्या रणमैदानातही उतरणार आहेत. पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 22 शेतकरी संघटना एकत्रितपणे उतरणार आहेत. या शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बलबीर सिंग राजेवाल यांचं नावही जाहीर केलं आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात ट्विस्ट आलं आहे. शेतकरी संघटना निवडणुकीत उतरल्याने त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पंजाबमधील शेतकऱ्यांनी संयुक्त समाज मोर्चा नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत एकूण 22 शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. चंदीगडमध्ये या नव्या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. या संघटनेने पंजाबच्या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला असून विधानसभेच्या सर्वच्या सर्व 117 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आम्हाला व्यवस्था बदलायची आहे. त्यामुळे लोकांनी आम्हला पाठिंबा द्यावा, असं आवाहन मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी केलं आहे.
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या 22 संघटना एकत्र आल्या असून त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सात संघटनांनी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी या मोर्चात सहभागी होण्यासही नकार दिला आहे. आम्ही नव्या मोर्चात सहभागी झालेलो नाही. आमचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही या मोर्चाचे समर्थक नाही आणि त्यांचे समर्थक नाही आहोत, असं या सात संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी 32 संघटनांनी 18 डिसेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही कोणत्याही निवडणुकीत उतरणार नाही. तसेच कोणत्याही पक्षाला पाठबळ देणार नाही, असं या 32 संघटनांनी स्पष्ट केलं होतं. या सर्व संघटना शेतकरी आंदोलनात होत्या. लुधियानापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर मुल्लांपूर दाखा येथे एका संयुक्त बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा न देण्याचा आणि निवडणुका न लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पंजाबच्या सर्वच्या सर्व 117 जागा लढण्यासाठी इतर राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. घरोघरी संपर्क करण्यापासून ते रॅली काढण्यावर आतापासूनच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही पंजाब लोक काँग्रेसची घोषणा केली आहे. त्यामुळे पंजाबचं राजकारण तापलं आहे.
पंजाबमध्ये शेतकरी संघटनांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आधीच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षामुळे काँग्रेसची चिंता वाढलेली असताना आता शेतकऱ्यांचं आव्हानही त्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता राखणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 25 December 2021 pic.twitter.com/cW4dJCku5R
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2021
संबंधित बातम्या:
लुधियाना स्फोट प्रकरण; बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यानेच ठेवला बॉम्ब