नवी दिल्ली : देशातील शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करणार आहेत. यासाठी ते दिल्लीकडे कूच करणार आहेत. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आजपासून ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देणारा कायदा लागू करणे. सोमवारी मध्यरात्री केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची चर्चाही झाली आहे. काही प्रश्नांवर एकमत झाले असले तरी शेतकरी मात्र आपल्या निर्धारावर ठाम आहेत. सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासनेही पूर्ण केली नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.
सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर २०२०-२१ च्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं सांगितले आहे. शेतकरी MSP साठी कायदेशीर हमीचा आग्रह धरतात, जे त्यांच्या मागण्यांमध्ये सर्वोच्च आहे.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे जगजित सिंग डल्लेवाल आणि किसान मजदूर संघर्ष समितीचे सर्वन सिंग पंधेर या शेतकरी नेत्यांनी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या सरकारच्या बांधिलकीवर शंका व्यक्त केली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एमएसपी, कर्जमाफी आणि कायदेशीर हमी यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सर्वांशिवाय, शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये भूसंपादन कायदा 2013 पुनर्संचयित करणे, जागतिक व्यापार संघटनेतून माघार घेणे आणि मागील आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे यासह अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.