नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आणखी एक पक्ष इंडिया आघाडीपासून दूर झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर उत्तर प्रदेशात जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आता नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अब्दुल्ला यांनी तर एनडीएसोबत युती करण्याचे संकेतही दिले आहे. त्यामुळे इंडिआ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीची अवस्था आता बिछडे सब बारी बारी… अशी झाली आहे.
फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर येथे बोलताना हे संकेत दिले आहे. जम्मू काश्मीरचे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकसाथ होतील असं मला वाटतं. सीट शेअरिंगबाबत बोलायचं झालं तर नॅशनल कॉन्फ्रन्स स्वबळावर निवडणूक लढणार आहे. यात काहीच शंका नाही, असं फारूख अब्दुल्ला यांनी सांगितलं. त्यामुळे अब्दुल्ला यांच्या विधानाने खळबळ उडाली असून इंडिया आघाडीतून अब्दुल्ला बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.
मला देश कायम आणि एकसंघ ठेवण्यासाठी जे करायचं ते मी करेन. आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. भविष्यात एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेला आम्ही नाकारू शकत नाही. इंडिया आघाडीत जागा वाटपावरून चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची आधीच घोषणा केलेली आहे. आधी टीएमसीने काँग्रेसला पश्चिम बंगालमधून दोन जागा घेण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यावरून काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी 42 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने आधी काँग्रेसला सहा जागांची ऑफर दिली होती. मात्र, त्यानंतर चर्चा झाली आणि चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही. दिल्लीत आपने काँग्रेसला अवघी एकच जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने दिल्लीबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, नाही तर आम्ही सातही जागांवर उमेदवार देऊ, असं आपने म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातही इंडिया आघाडी संकटात आहे. जयंत पाटील यांची राष्ट्रीय लोकदल इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. चौधरी यांनी एनडीएला साथ दिली आहे. तर समाजवादी पार्टीने काँग्रेसला फक्त 11 जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसने अजून काहीच भूमिका घेतलेली नाही.