ग्वालियर | 25 जुलै 2023 : भारतातून पाकिस्तानला फेसबुक फ्रेंडला भेटायला गेलेल्या अंजूने धर्मांतर केलं आहे. तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच तिने स्वत:चं नाव फतिमा असं ठेवलंय. तसेच तिने तिच्या नसरुल्ला या फेसबुक फ्रेंडसोबत लग्नदेखील केल्याची माहिती समोर आलीय. अंजूने घेतलेल्या या निर्णयावर तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. अंजूचे वडील हे मध्य प्रदेशच्या टेकनपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“ती आमच्यासाठी मेली आहे”, असं अंजूचे वडील म्हणाले. मला कोणत्याच गोष्टीची माहिती नाही. “आता आमचं तिच्यासाठी काहीच घेणं-देणं नाही. तिला जे करायचंय ते तिने करावं”, असं अंजूचे वडील म्हणाले. अंजू पाकिस्तानला निघून का गेली असेल? असा प्रश्न पत्रकारांनी अंजूच्या पित्याला विचारला. त्यावर त्यांनी “मला तिच्या मनात नेमकं काय चाललंय ते माहीत नाही. माझी तिच्यासोबत गेल्या वर्षभरापासून बोलणं झालेलं नाही”, असं अंजूचे वडील म्हणाले.
“जी मुलगा आपल्या पोटच्या लेकरांना सोडून गेली तिच्यासोबत आमचं नातं संपलं आहे. तिने पतीला सोडलं ते जाऊद्या, पण जी व्यक्ती आपल्या मुलांना सोडते त्या व्यक्तीसोबत कुठलं नातं कसं असू शकतं?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी अंजूच्या पित्यांना तिचा विझा संपल्यावर ती परत भारतात येईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आक्रमक उत्तर दिलं. तिचा विझा संपो किंवा ती स्वत: संपली तरी मला काही देणं-घेणं नाही, असं अंजूचे वडील म्हणाले.
“तिला हे सगळं करायचं होतं तर तिने आधी नवऱ्यासोबत घटस्फोट घ्यायला हवा होता. इथून सर्व काही करुन गेली असती. तिने त्या मुलाची आणि स्वत:च्या दोन मुलांचं आयुष्य खराब केलं आहे. आता तिच्या 14 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाच्या मुलाच्या पालन पोषणाची जबाबदारी कोण घेईल?”, असं अंजूचे पिता म्हणाले.
दरम्यान, अंजूचा उपयोग पाकिस्तानने गुप्तहेर म्हणून तर केला नाही ना? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी असं काही नाहीय. मी 42 वर्षांपासून इथे राहतो, असं प्रत्युत्तर दिलं. “माझे मुलं गुन्हेगारी वृत्तीचे नाहीत”, असं ते म्हणाले. तर टेकनपूर गावच्या सरपंचांनी सांगितलं की, “संपूर्ण गावाचं अंजू्च्या या कृतीमुळे शरमेने मान खाली गेलीय. पण यामध्ये तिच्या आई-वडिलांचा काही दोष नाही.”