लग्न समारंभाचा आनंद सुरु होता. वारती जेवणाचा स्वाद घेत होते. परंतु अचानक दोन युवक लग्न मांडवात आले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात लग्न मांडवातच एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. हरियाणामधील रोहतकमध्ये झालेल्या या घटनेमुळे आनंदाचा प्रसंग क्षणात दु:खात गेला. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव मंजीत अहलावत आहे. गँगवारचा वादामुळे हा गोळीबार झाल्याचा सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अमेरिकामध्ये असलेल्या गँगस्टर हिमांशू याचा हात असल्याचे बोलले जात आहे.
रोहतक जिल्ह्यातील किलोई गावात लग्न समारंभ सुरु होता. लग्नाची वरात झज्जर जिल्ह्यातील दिगल गावातून आली होती. लग्नाची मिरवणूक भूमी गार्डनमध्ये पोहोचली होती आणि सर्वजण लग्नाच्या आनंदात सहभागी झाले होते. तेव्हा अचानक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये काही युवक आले. मनजीत आणि मनदीप एका टेबलवर जेवत असताना, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुमारे आठ ते दहा राउंड त्यांनी फायर केले. मनजीतच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत बसलेल्या मनदीपच्या पायाला गोळी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मनजीतच्या हत्येमागे हिमांशू भाऊ टोळीचा हात असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेत राहणारा गँगस्टर हिमांशू भाऊने दिल्लीतही अनेक गुन्हे केले आहेत. मनजीत अहलावत हे दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते. सध्या ते फायनान्समध्ये काम करतात.
हिमांशू भाऊ टोळीची गुन्हेगारी कुंडली बरीच जुनी आहे. हिमांशू याने प्रथम गोहाना येथील मिठाई व्यवसायी मातुराम यांच्या दुकानावर गोळीबार करून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतली होती. भाऊ गँग प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही पहिलीच घटना होती. तेव्हापासून भाऊ टोळी अनेक गंभीर गुन्हे करण्यासाठी कुप्रसिद्ध झाली आहे. हिमांशू आता अमेरिकेत बसून हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह अनेक गुन्हेगारी टोळी चालवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना गँगमध्ये भरती करतो.