मुंबई | 31 जुलै 2023 : “चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?” हे गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे. याशिवाय “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई”, हे गाणं देखील आपण ऐकलंय. चंद्राबद्दल आपल्या मनात एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण आहे. चंद्राला कुणी चांदोबा, कुणी चांदू मामा असं लाडात म्हणतं. मराठी, हिंदी साहित्य क्षेत्रात चंद्राचं वर्णन अनेक कवितांमध्ये बघायला मिळतं. त्याला कारणही अगदी तसंच आहे. कारण चंद्राचा प्रकाश हा अतिशय शितल असतो. त्यामुळे तो एक वेगळा दिलासा देत असतो. रात्रीच्यावेळी शेतात काम करत असताना चंद्राचा प्रकाश खूप छान वाटतो. रात्रीच्या अंधारात चंद्राचं सौंदर्य मनात वेगळी जागा निर्माण करतं.
विशेष म्हणजे उद्याची रात्र ही आपल्यासाठी जास्त विशेष असणार आहे. कारण आपल्या सर्वांचा आवडता चांदोबा आकाशात आपल्याला नियमित दिसतो त्यापेक्षा आकाराने खूप मोठा दिसणार आहे. त्यामुळे हा एक सूवर्णयोग मानला जातोय. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात असे योग दोनवेळा येणार आहेत.
आकाशात उद्याच्या रात्री दुर्मिळ असं चित्र दिसणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे. या महिन्यात आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे. पहिला सुपरमून हा उद्याच्या 1 ऑगस्टच्या रात्री दिसणार आहे. तर दुसरा सुपरमून हा 30 ऑगस्टच्या रात्री दिसणार आहे.
विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात दिसणारा सुपरमून हा आतापर्यंत दिसलेल्या सुपरमून पेक्षा जास्त मोठा असणार आहे. कारण चंद्र उद्या पृथ्वीच्या अतिशय जवळ असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना चंद्राचं मोठं रुप यासोबत त्याचा रंगही बघायला मिळणार आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सध्याच्या दिवसांमध्ये पृथ्वी आणि चंद्राच्या चारही कक्षा 5 डिग्रीच्या अंशाने झुकलेल्या असतात. 1 ऑगस्टला दिसणारा चंद्राला स्टर्जन मून असं म्हटलं जातं. या दिवशी चंद्र जास्त चमकदार आणि मोठ्या आकाराचा दिसतो. उद्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास चंद्राचा भलामोठा आकार आपल्याला बघायला मिळणार आहे. सूर्यास्तानंतर चंद्र दक्षिण-पूर्व क्षितिजावर येईल तेव्हा देखील त्याला पाहता येईल.
विशेष म्हणजे उद्याच्या रात्रीनंतर 30 ऑगस्टला आपल्याला आकाशात आणखी एक अद्भूत गोष्ट बघायला मिळणार आहे. त्याला ब्लूमून असं म्हटलं जातं. याचा चंद्राच्या रंगाशी काही घेणंदेणं तसं नसतं. पण नेहमी हे कोणत्याही महिन्याच्या दुसऱ्या पौर्णिमेला दिसतं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या पौर्णिमेच्या वेळी सुपर ब्लूमून दिसणार आहे. दर तीन वर्षांनी ब्लूमून दिसतो. याआधी 2021 मध्ये ब्लूमून बघायला मिळाला होता. त्यानंतर यावर्षी तो दिसणार आहेत. तसेच यावर्षानंतर हा ब्लूमून थेट 2026 मध्ये बघायला मिळणार आहे.