Rajasthan CM : पहिल्यांदाच आमदार आणि थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी

| Updated on: Dec 12, 2023 | 4:52 PM

Rajasthan New CM : राजस्थानला अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपने राजस्थानची जबाबदारी जुन्या कार्यकर्त्याकडे दिली आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असतील.

Rajasthan CM : पहिल्यांदाच आमदार आणि थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी
bhajanlal sharma
Follow us on

Rajasthan New CM : राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. सांगानेर मतदारसंघातून आमदार झालेले भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. भजनलाल शर्मा हे अनेक वर्षापासून भाजपच्या संघटनेचं काम करत होते. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या जागेवरून निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते पहिल्यांदाच मुख्यमंत्रीही झाले. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

भजनलाल शर्मा हे ४ वेळा प्रदेश सरचिटणीस राहिले आहेत. तसेच त्यांनी RSS आणि ABVP मध्ये देखील काम केले आहे. सांगनेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथून त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. संघटनेत त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना आता थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही असतील. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

अनेक जण होते शर्यतीत

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे हे राजस्थानचे निरीक्षक म्हणून जयपूरला आले होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी आमदारांची बैठक घेतली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांच्याशी देखील चर्चा केली. त्यानंतर भनजलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा झाली.

राजस्थानमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते होते. वसुंधरा राजे, बाबा बालकनाथ, गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दिया कुमारी आणि राजवर्धन राठोड ही नावेही स्पर्धेत होती.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड प्रमाणे राजस्थानमध्येही भाजपने धक्का दिला आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांना बाजुला करत भाजपच्या हायकमांडने आपल्या निर्णयाने सर्वांना चकित केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच घोषित केला नव्हता. त्यामुळे तिन्ही राज्यात सस्पेंस कायम होता. राजस्थानमधील 200 पैकी 115 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला 69 जागा आल्या आहेत.