नवी दिल्ली : अमेरिका भारतावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच कारस्थान रचल्याचा आरोप करत आहे. भारतीय अधिकारी यामध्ये सहभागी असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेच्या या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात अमेरिकेकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी सादर करावेत, असं पीएम मोदींनी म्हटलय. अशा प्रकारच्या काही घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“जर मला कोणी या बद्दल पुरावे दिले, तर निश्चित मी यावर विचार करेन. जर आमच्या कुठल्या नागरिकांने चांगल किंवा वाईट केलं असेल, तर मी याचा विचार करेन. कायद्याच्या राज्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत” असं फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले. पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकारी सहभागी असल्याचा आरोप अमेरिकेने केलाय.
भारताने त्याला कधी दहशतवादी ठरवलेलं?
या कारस्थानात एक भारतीय अधिकारी सहभागी आहे असं बायडेन प्रशासनाने म्हटलं आहे. अमेरिकेच्या या आरोपानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक समिती स्थापन केलीय. ही समिती अमेरिकेचे दावे आणि पुराव्यांचा तपास करेल. पाश्चिमात्य देशांनी फुटीरतावादी तत्वांना प्रोत्साहन देऊ नये, असं पीएम मोदी म्हणाले. भारताने गुरपतवंत सिंह पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी घोषित केलं होतं.
कुठे झाली अटक?
अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने 29 नोव्हेंबरला एक स्टेटमेंट दिलं होतं. भारतीय वंशाचे अधिकारी निखिल गुप्ता यांनी न्यू यॉर्कमध्ये खलिस्तानी नेता पन्नूच्या हत्येचा कट रचला. गुप्ताला भारतीय अधिकाऱ्याकडून निर्देश मिळाले होते. निखिल गुप्ताला जून महिन्यात चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली. सध्या अमेरिकेकडे त्याच्या प्रत्यर्पणची प्रक्रिया सुरु आहे.
पन्नू 2019 पासून NIA च्या रडारवर
राष्ट्रीय तपास यंत्रणेने यावर्षी पन्नू विरोधात पहिला गुन्हा नोंदवला. खलिस्तानी दहशतवादी पन्नू 2019 पासून NIA च्या रडारवर आहे. परदेशात राहून पन्नूने सतत भारतविरोधी कारवाया केल्या आहेत. पंजाबमध्ये फुटीरतावादाला बळ दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.