आग्र्याच्या किल्ल्यात गुंजणार महाराजांची शौर्यगाथा, महाराष्ट्रातून कोण जाणार

| Updated on: Feb 19, 2023 | 7:39 AM

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला प्रारंभ महाराष्ट्र गीताने होईल.

आग्र्याच्या किल्ल्यात गुंजणार महाराजांची शौर्यगाथा, महाराष्ट्रातून कोण जाणार
छत्रपती शिवाजी महाराज
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

आग्रा : छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे (shivaji maharaj and sambhaji maharaj) यांना ज्या किल्ल्यात औरंगजेबाने कैद केले होते त्या ठिकाणी आज प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमसाठी राज्यातून १० हजार शिवभक्त गेले आहेत. परंतु किल्ल्यात फक्त ४०० शिवभक्तांना प्रवेश मिळणार आहे. यानिमित्ताने आग्रा किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा गुंजणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सहभागी होणार आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती देशभरात साजरी होत आहे. यामुळे आग्रा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने मागितली होती. त्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून परवानगी मिळाली.

हे सुद्धा वाचा

आग्रा येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, शिवजयंतीचा पहिला टप्पा शुक्रवारी रंगीत तालीम करुन झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून हजारो जण येणार आहेत. तसेच आग्रा कोर्टासमोरील रामलीला मैदानावर मोठा एलईडी स्क्रीन लावून हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

दिवाने-आममध्ये कार्यक्रमाचा मुख्य मंच सजवण्यात आला आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय त्यांचे अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सीएम योगी आदित्यनाथही भेट देणार आहेत.

दिवाण-ए-आममध्ये विशेष नाटक


आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे.  या ठिकाणी कार्यक्रमाला प्रारंभ महाराष्ट्र गीताने होईल. त्यानंतर शिवाजी महाराज आग्य्राहून कसे महाराष्ट्रात परतले यावर विशेष नाटक सादर होणार आहे.

शिवाजी महाराज व आग्राचे काय आहे संबंध


आग्राचे इतिहासकार राजकिशोर राजे यांच्या ‘तवारीख-ए-आग्रा’ या पुस्तकानुसार १६६६ मध्ये औरंगजेब आग्र्यात राज्य करत होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे यांच्यांसह आग्रा किल्ल्यावर पोहोचले. योग्य सन्मान न मिळाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोध केला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना कैद केले. बर्‍याच दिवसांच्या कैदेनंतर शिवाजी महाराज व संभाजी राजे आपल्या युक्तीचा वापर करून औरंगजेबाच्या तावडीतून बाहेर पडले.

शिवनेरीत कार्यक्रम

जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजन्म उत्सव साजरा होत आहे.  या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  यांच्या हस्ते शिवनेरीच्या पायथ्याशी करण्यात आले.