अयोध्या | 22 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतिक्षित अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. रामभक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण गेल्या 500 वर्षांनंतर आज रामलल्ला भव्य अशा राममंदिरात विराजमान झाले आहेत. देशात घरोघरी आज दिवाळी साजरी केली जात आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या या कार्यक्रमाला देशभरातील साधुसंत, महंत आणि सेलिब्रेटींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत राम मंदिरात आज पूजा झाली. रामलल्ला यांच्या प्राण प्रतिष्ठा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले बघायला मिळाले. नरेंद्र मोदी यांनी अतिशय आनंदात आपल्या भावना व्यक्त केल्या. “कालचक्र बदलत आहे. आजची पिढी आणि येणारी पिढी आपलं हे कार्य कायम लक्षात ठेवेल. त्यामुळेच मी म्हणतो हीच योग्यवेळ आहे. आपल्याला आजपासून एक हजार वर्षानंतरच्या भारताची निर्मितीची पायाभरणी करायची आहे”, असं नरेंद्र मोदी देशवासीयांना उद्देशून म्हणाले.
“येणारा काळ यशाचा आहे. येणारा काळ सिद्धीचा आहे. हे मंदिर साक्षी असेल. भारताच्या उद्याचं भारताच्या उत्कर्षाचं हे राम मंदिर साक्षीदार होईल. भव्य भारताच्या अभ्युद्याचा, विकसित भारताचा साक्षीदार बनेल. हा भारताचा काळ आहे. भारत पुढे जाणार आहे. युगानुयुगाच्या प्रतिक्षेनंतर भारत इथे पोहोचला आहे. आपण अनेक शतके या दिवसाची प्रतिक्षा करत होतो. आता आपण थांबायचं नाही. पुढे पुढे जायचं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“आजचा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. अनेक राष्ट्र इतिहासात गुरफुटून जातात. त्यांनी इतिहास उलगडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातून अडचणी आल्या. पण आपण इतिहासाची ही गाठ अत्यंत भावूकतेने सोडली आहे. आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर होणार आहे. राम मंदिर बनलं तर आग लागेल असं काही लोक म्हणत होते. पण या लोकांना भारताच्या सामाजिक भावाची पवित्रता माहीतच नव्हती. रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती सदभाव, समन्वयाचं प्रतीक आहे. भारतीय समाजाची एकरुपता आहे. हे नवनिर्माण आगीला नव्हे तर ऊर्जेला जन्म देत आहे, हे आपण पाहत आहोत. भारतीय समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या लोकांना मी आवाहन करतो, या पुनर्विचार करा. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मंदिर फक्त देवाचं मंदिर नाही. तर भारताच्या दृष्टीचे भारताच्या दर्शनाचे मंदिर आहे. हे रामाच्या रुपातील राष्ट्र चेतनेचं मंदिर आहे. राम भारताची अस्था आहा. राम भारत आधार आहे. राम भारताचा विचार आहे, राम भारताची चेतना आहे, चिंतन आहे. प्रतिष्ठा आहे, प्रताप आहे. प्रवाह आहे, प्रभावही आहे. राम नेती आहे, नीती आहे. राम नित्यता आहे. राम निरंतर आहे. राम व्यापक आहे. राम विश्व आहे. राम विश्वात्मा आहे. जेव्हा रामाची प्रतिष्ठा होते तेव्हा त्याचा प्रभाव वर्षभरासाठी नसतो. तर हजारो वर्षासाठीचा असतो”, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
“राम चंद्र वनवासात गेले तेव्हा कालचक्र बदललं होतं. तसंच आता कालचक्र बदललं असून शुभ दिशेला जाणार आहे. मी अकरा दिवस उपवास केला. या काळात मी अशा ठिकाणी गेलो, जिथे प्रभू रामाचे चरणस्पर्श झाले आहेत. नाशिकपासून तामिळनाडूपर्यंत मी गेलो. सागरपासून शरयू पर्यंतचा प्रवास करण्याची मला संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी राम नामाचा उत्सव सुरू होता. प्रभू राम हा भारताच्या आत्म्याशी जोडलेला आहे. भारतवासियांच्या मनात रुजलेला आहे”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“त्या कालखंडात तो वियोग १४ वर्षाचा होता. या युगात तर अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षाचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. भारताच्या संविधानात पहिल्याच प्रतीमध्ये भगवान राम विराजमान आहे. राम मंदिरासाठी कायदेशीर लढाई सुरू राहिली. मी भारताच्या न्यायपालिकेचे आभार मानतो. त्यांनी न्यायाची लाज राखली. न्यायाचे परिणाम म्हणून प्रभू रामाचे मंदिरही न्यायबद्ध पद्धतीने झाले. आज संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घराघरात रामज्योती प्रज्वलीत केली जाणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.