गुमला : मुलीचे लग्न थाटामाटात पार पाडून तिची पाठवणी करत सर्व वऱ्हाडी आपल्या गावी परतत होते. मात्र वाटेतच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी तीन वेळा पलटली आणि अपघातग्रस्त झाली. या अपघातात नवरी मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 28 जण जखमी झाले असून, 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांना उपचारासाठी रिम्समध्ये रेफर करण्यात आले आहे. गुमला येथील डुमरी ब्लॉकमध्ये ही घटना घडली. मुलीचे वऱ्हाडी लग्नानंतर पिकअप व्हॅनमधून डुमरी येथील सारंगडीह येथून आपल्या घरी कटारी येथे परतत होते. गाडीत 45-55 जण होते. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बसमधून चैनपूर उपआरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर 12 गंभीर जखमींना सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. यातील तिघांना सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रिम्समध्ये पाठवले. मृतांमध्ये मुलीची आई लुंडारी देवी, वडील सुंदर गैर यांचा समावेश आहे. तर सविता देवी, पुलीकर किंदो, अलसू नागेशिया अशी अन्य मृतांची नावे आहेत.
लग्नानंतर मुलीला निरोप देण्यात आला. त्यानंतर मुलीच्या बाजूचे सर्व लोक पिकअपमधून घरी येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर वधू-वरांच्या घरावर शोककळा पसरली आहे. घरात मंगलकार्य घडल्यानंतर काही तासातच लग्नघरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या पाठवणी करुन डोळ्यांच्या कडाही सुकल्या नव्हत्या, अन् अचानक जे घडले त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.