श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एक जवान गंभीर जखमी आहे. या जवानाला तातडीने भारतीय सैन्याच्या राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने हा अतिरेकी हल्ला असल्याच्या वृत्तोला दुजोरा दिला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या PAFF (पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंट) या अतिरेक्यांच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
संबंधित घटना ही आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. राजौरी सेक्टरमध्ये भीमबेर आणि पुंछ या परिसरातील हायवेने जावानांची गाडी जात होती. यावेळी अज्ञात अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. त्यांच्या ग्रेनेड हल्ल्यामुळेच गाडीला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हल्ला घडला त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे लांबचं फारसं दिसत नव्हतं. याच गोष्टीचा फायदा घेत अतिरेक्यांनी सैनिकांच्या गाडीवर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काउंटर टेररिस्ट ऑपरेशनसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स यूनिटच्या पाच जवानांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. तर एक जवान गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केल्यानंतर तीन बाजूने फायरिंग केली. एकूण चार अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर गाडीच्या फ्यूल टँकला आगली. त्यानंतर संपूर्ण गाडीला आग लागली. जवान भाजीपाला आणि इतर सामान घेऊन जात असताना हा हल्ला घडला. जम्मू-काश्मीरच्या जी-20 संमेलनाच्या आधी हा सुनियोजित हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
या हल्ल्याच्या घटनेवर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त केलं. “पुंछमध्ये एक घडलेल्या एका दुखद घटनेत भारताच्या शूर जवानांच्या शहीद होण्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झालं आहे. राष्ट्रसेवासाठी त्यांनी केलेली समृद्ध सेवा देव कधीही विसरणार नाही. या कठीण प्रसंगात मी शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे”, असं उपराज्यपालांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “पुंछमध्ये एका अतिरेकी हल्ल्याची भयानक बातमी, या हल्ल्यात 5 जवानांचा मृत्यू झाला. मी या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या प्रियजनांप्रती संवेदना व्यक्त करतो. दिवंगतांच्या आत्म्यास शांती लाभो”, अशा शब्दांत उमर अब्दुल्ला यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.