कधी 5 तर कधी 14 दिवसाचे मुख्यमंत्री… माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन; जाणून घ्या राजकीय प्रवास

| Updated on: Dec 20, 2024 | 1:43 PM

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इनेलोचे नेते ओम प्रकाश चौटाला यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. ते सात वेळा आमदार आणि पाच वेळा मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. त्यांचा राजकीय प्रवास आणि हरियाणाच्या विकासात त्यांचे योगदान या लेखात वर्णन केले आहे. त्यांच्या निधनाने हरियाणा राजकारणात मोठे शोक पसरला आहे.

कधी 5 तर कधी 14 दिवसाचे मुख्यमंत्री... माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन; जाणून घ्या राजकीय प्रवास
Om Prakash Chautala
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळीच 11.30 वाजता त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. चौटाला यांच्या निधनामुळे हरियाणा आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ओम प्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार होते. पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

ओम प्रकाश चौटाला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे चिरंजीव होते. ओम प्रकाश चौटाला यांचा जन्म 1 जानेवारी 1935 मध्ये हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील चौटाला गावात झाला होता. चौटाला हरियाणाचे सातवे मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील चौधरी देवीलाल चौटाला यांची हरियाणा राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका होती. हरियाणाची स्थापना झाल्यावर देवीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे उपपंतप्रधान झाले होते.

ओम प्रकाश चौटाला यांनी हरियाणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे राहिले. सत्तेत असल्यावर आणि विरोधात असतानाही त्यांच्या भाषणात शेतकरी आणि ग्रामीण भागावर भाष्य असायचं. हरियाणातील सर्वात सक्रिय नेता म्हणूनही त्यांची ओळख होती.

राजकीय सफर

ओम प्रकाश चौटाला 1970 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरले आणि जिंकले. त्यानंतर ते राज्यसभेत गेले होते.

7 डिसेंबर 1989 रोजी ते हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. पण ते या पदावर 171 दिवस (22 मे 1990) पर्यंतच राहिले.

दोन महिन्यानंतर 12 जुलै 1990 रोजी ते दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले. यावेळी ते केवळ पाच दिवसच मुख्यमंत्रीपदी राहिले.

22 मार्च 1991 रोजी ते तिसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 14 दिवस मुख्यमंत्रीपदी राहिले.

त्यानंतर एक वर्षानंतर म्हणजे 24 जुलै 1999 मध्ये ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आणि चार महिने त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.

डिसेंबर 1999 मध्ये त्यांनी विधानसभा भंग केली. त्यानंतर 2 मार्च 2000 रोजी चौटाला पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. यावेळी मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.

2013मध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात ओमप्रकाश चौटाला यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली गेली.

दरम्यान, चौटाला यांच्या निधनावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. इनेलो सुप्रीमो आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी ओम प्रकाश चौटाला यांचं जाणं वेदनादायी आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांनी आयुष्यभर हरियाणाची सेवा केली. त्यांच्या जाण्याने देश आणि हरियाणाच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे, असं नायब सिंग सैनी म्हणाले.