बांदा : उत्तर प्रदेशातील झांसी- मिर्जापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अत्यंत भीषण आणि दुर्देवी अपघात झाला आहे. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेली बोलेरो जीप झाडाला जाऊन जोरदार आदळली. या अपघातात ड्रायव्हर चार जणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाली. लग्नाचं वऱ्हाड या जीपमधून प्रवास करत होतं. लग्न समारंभ आटोपून ही वऱ्हाडी मंडळी येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर अख्खं वऱ्हाडच रुग्णालयात पोहोचंल होतं.
या जीपमधून एकूण सात लोक प्रवास करत होते. हे सर्व वऱ्हाडी होते. जीप अपघात होताच जवळच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीसही तात्काळ घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी तात्काळ सर्व जखमांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी जीप चालक आणि एका व्यक्तीला मृत घोषित केलं. या अपघातात एकूण चार लोकांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातील सातहीजण गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांनी जिल्हा रुग्णालयात जात असतानाच रस्त्यातच जीव सोडला. इतर तिघा जखमींना कानपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बदौसा पोलीस ठाणे क्षेत्रातील तुर्रा पुलावर ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार जीप अत्यंत वेगात चालली होती. यावेळी ड्रायव्हरला डुलकी लागली. त्यामुळे त्याचं जीपवरील नियंत्रण सुटलं आणि जीप झाडाला जाऊन धडकली. त्यामुळे या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टमचा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे.
काही लोकांनी हा अपघात प्रत्यक्ष घडताना पाहिला आहे. त्यांच्या मते हा अपघात प्रचंड भयानक होता. हा अपघात पाहिला तेव्हा आमच्या अंगावर काटे आले. जीप झाडाला धडकल्याने जीपचा पुढचा भाग चक्काचूर झाला होता. ड्रायव्हरजवळची केबिनही संपूर्णपणे नेस्तनाबूत झाली होती. या अपघातात चार लोक जागीच ठार झाले. जखमी आणि मृतांना बाहेर काढणंही मुश्किल झालं होतं, असं प्रत्यक्षदर्शांनी सांगितलं.