भारतीय वायूसेनेच्या 92 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चेन्नईत एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या हवाई शोच्या दरम्यान डिहायड्रेशनमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 230 पेक्षा जास्त जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पेरुंगलथूरचे 48 वर्षीय श्रीनिवास, तिरुवोट्टियूरचे 34 वर्षीय कार्तिकेयन आणि कोरुकुपेटचे 56 वर्षीय जॉन यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांमधील खराब कॉर्डिनेशनमुळे चेन्नईत लाखो नागरीक फसले होते. शहरातील अनेक भागात अशाप्रकारच्या घटना समोर आल्या. अनेक तास लाखो नागरीक फसले होते. अखेर त्यांना गर्दीमुळे आणि पाणी न मिळाल्यामुळे त्रास झाला, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. कार्यक्रमानंतर घरी परतताना लाखो नागरीक एकत्र बाहेर पडत असताना संबंधित घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मरीना बीच येथे एअर शो रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत चालला. या कार्यक्रमासाठी सकाळी 8 वाजेपासून नागरीक कार्यक्रमस्थळी आले होते. मरीना बीचवर सकाळपासून तडपतं ऊन होतं. गरमीमुळे कार्यक्रम सुरु होण्याआधीच अनेक वयस्कर नागरीक बेशुद्ध झाले होते.
गर्दीमुळे आजूबाजूच्या पाणी विक्रेत्यांना परिसरातून हटवण्याच आलं होतं. तिच मोठी चूक ठरली. कारण तिथे उपस्थित असलेल्या लाखो नागरीकांना त्यामुळे पाणी मिळालं नाही. कार्यक्रम संपताच लाखो नागरीक बीचपासून बाहेर पडू लागले. यावेळी पूर्ण रस्ता ब्लॉक झाला. प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे शेकडो वाहनं स्थानबद्ध झाले. तडपतं ऊन आणि गर्दी यामुळे नागरीक रस्त्याच्या कडेलाच बसले.
यावेळी समुद्र किनाऱ्यावर राहणारी अनेक नागरीक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी नागरिकांना पाणी देवून मदत केली. याचवेळी मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. कारण नागरिक तिथे बसून कंटाळले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर घरी जायचं होतं. पण त्यामुळे अनेकांना त्रास झाला.