मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली होती. या पत्रकार परिषदमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन गेल्याचा आरोप केला होता. संबंधित प्रकल्पाचं नाव वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प असं आहे. हा प्रकल्प 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा आहे. हा प्रकल्प पुण्याच्या तळेगाव येथे प्रस्तावित होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआधी हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. पण आता या प्रकल्पाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी आहे. या कंपनीने भारतातील वेदांता कंपनीसोबत करार केला होता. गुजरातमधील प्रस्तावित सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी हा करार करण्यात आला होता. पण फॉक्सकॉनने आता या करारातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकर कंपनी आहे. तर वेदांता ही कंपनी भारतातील मेटलपासून आईलपर्यंतच्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी एक करार केला होता. या करारातंर्गत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन प्लांट बनवण्यात येणार आहे. पण त्याआधीच फॉक्सकॉनने माघार घेतली आहे.
“फॉक्सकॉनने ठरवलं आहे की, कंपनी आता वेदांतासोबतच्या जॉईंट वेंचरवर पुढे काम करणार नाही. सेमीकंडक्टरच्या एक महान विचारांना वास्तव्यात साकार करण्यासाठी वेदांतासोबत एक वर्षापासून जास्त वेळ काम केलं. पण आता जॉईंट वेंचरपासून माघार घेत आहे. हा निर्णय दोघांच्या संघमताने घेण्यात आला आहे. आता हा प्रकल्प पूर्णपणे वेदांताच्या अखत्यारित पार पडेल”, असं फॉक्सकॉनकडून सांगण्यात आलं आहे. पण तरीही कारारातून माघार घेण्याचं खरं कारण फॉक्सकॉनकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.