नवी दिल्ली – भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma)पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचल्या आहेत. मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी केलेल्या टिप्पणीनंतर, त्यांचा अधिक धमक्या (new threats)येण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोन महिन्यांपूर्वी टीव्हीवरील चर्चेच्या कार्यक्रमात त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक इस्लामिक राष्ट्रांनीही यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना प्रवक्ते पदावरुन निलंबित केले होते. यापूर्वीही नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी देशाभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एफआयआरची सुनावणी एकाच ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. याला सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता आणि त्यांच्याविरोधात काही कठोर वक्तव्ये केली होती.
नुपूर शर्मा यांनी दाखल केलेली नवी याचिका अद्याप सुनावणीला आलेली नाही. नव्या याचिकेत त्यांनी नव्याने येत असलेल्या धमक्या आणि होत असलेली टीकेचा हवाला दिला आहे. त्यांना आता नव्याने बलात्कार आणि हत्येच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी यात नमूद केलेले आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या दोघांची आत्तापर्यंत देशात हत्या करण्यात आली आहे.
यापूर्वीही जीवाला धोका असल्याचे सांगत नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. तसेच देशात निरनिराळ्या ठिकाणी दाखल झालेल्या एफआयआरची सुनावणी एकाच जागी करण्याची विनंतीही त्यांनी केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना चांगलेच फटकारले होते. देशातील सध्याच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात, असे सुप्रीम कोर्टाने खडसावले होते. त्यानंतत नुपूर यांच्याकडून याचिका परत घेण्यात आली होती.