नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : जगात विश्वासाचं संकट निर्माण झालं आहे. अनेक वर्षाच्या समस्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ती वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपल्याला मानव शांती दृष्टीकोणातून आपलं दायित्त्व पार पाडून पुढे जायचं आहे. कोरोना नंतर विश्वासाचं मोठं संकट उभं राहिलं. युद्धाने हे विश्वासाचं संकट अधिक गडद केलं. जर आपण कोरोनाचं संकट घालवू शकतो. कोरोनाला पराभूत करू शकतो तर आपल्यातील विश्वासाच्या संकटावरही मात करू शकतो, असं सांगतानाच सबका साथ आणि सबका विश्वास या मंत्रानेच आपल्याला पुढे जावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्लीतील प्रगती मंडपावर जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये जी-20 परिषदेचं उद्घाटन केलं. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. आपण सर्व मिळून वैश्विकस्तरावर हे संकट विश्वासात बदलूया. सर्वांनी एकत्रित हातात हात घालून चालण्याची हीच ती वेळ आहे. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयासचा मंत्र आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी यांनी परिषदेच्या सुरुवातीलाच मोरक्को येथील भूकंपाच्या घटनेवर त्यांनी दु:ख व्यक्त केलं. आज आपण जिथे बसलो आहोत, तिथून काही किलोमीटर अंतरावरच एक अडीच हजार वर्ष जुना स्तंभ आहे. मानवतेचं कल्याण सदैव सुनिश्चित केलं पाहिजे, असं या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलं आहे. अडीच हजार वर्षापूर्वी भारतभूमीने हा संदेश संपूर्ण जगाला दिला होता. 21 व्या शतकाचा हा काळ संपूर्ण जगाला नवीन दिशा देईल. दुनियेला आपल्याकडून उत्तर हवं आहे. त्यामुळेच जबाबदारी स्वीकारून आपल्या सर्वांना पुढे गेलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. मोदी यांनी आफ्रिकन युनियनला जी-20 परिषदेचं सदस्यत्व देण्यात येत असल्याची घोषणा केली. सर्वांची साथ हवी या भावनेने भारताने हा प्रस्ताव ठेवला होता. आफ्रिकन यूनियनला जी-20 चं स्थायी सदस्यत्व देण्याचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर सर्वांची सहमती आहे, असा माझा विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही आफ्रिकन यूनियनला स्थायी सदस्यत्वासाठी निमंत्रित करत आहोत, असं मोदी यांनी म्हटलं.