श्रीहरीकोटा | 21 ऑक्टोबर 2023 : प्रत्येक अपयशानंतर यश येतंच, फक्त प्रयत्न सोडता कामा नये. याची प्रचिती आज पुन्हा आली. भारताने गगनयानची पहिली उड्डाण चाचणी आज घेतली. पहिल्याच प्रयत्नात खराब हवामानामुळे भारताला अपयश आलं. पण शास्त्रज्ञ निराश झाले नाही. चंद्राला गवसणी घालणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरूच ठेवले अन् अवघ्या दोन तासात दुसऱ्यांदा चाचणी घेतली आणि गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली. क्रू मॉड्यूलचं बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग झालं. हे लँडिंग होताच श्रीहरीकोटीतील सतीश धवन अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञच नव्हे तर देशभरातील नागरिकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. शास्त्रज्ञांच्या या मोहिमेला सलाम ठोकला. देशभरात जल्लोष सुरू आहे.
गगनयान मिशनमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. गगनयान मिशन यशस्वी झाल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन यशस्वी होताच शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. टीवी-डी-1 बूस्टरच्या मदतीने हे लॉन्चिंग केलं गेलं. श्रीहरीकोटातून यानाने उड्डाण घेतलं आणि बंगालच्या खाडीला स्पर्श केला म्हणजे बंगालच्या खाडीत यशस्वी लँडिंग झालं. भारत गगनयान मिशन 2025 ची तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे लँडिंग केलं जात आहे.
सकाळीच 8 वाजता हे मिशन पूर्ण केलं जाणार होतं. पण त्यावेळी तांत्रिक बिघाड आणि हवामानातील बदलामुळे उड्डाण होऊ शकलं नाही. टेस्ट व्हेईकल पूर्णपणे सुरक्षित होतं. पण इंजिन वेळेत सुरू झालं नाही. त्यामुळे त्यातील तांत्रिक कारणांचा शोध घेण्यात आला आणि 10 वाजेच्या आधीच उड्डाण करण्यात आलं. हे उड्डाण यशस्वी होताच सतीश धवन अंतराळ केंद्रात एकच जल्लोष झाला. शास्त्रज्ञांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तर देशभरातील नागरिकांनीही हे थेट प्रक्षेपण पाहताना उड्डाण यशस्वी होताच टाळ्या वाजवून जल्लोष केला.
आजच्या पहिल्या उड्डाण चाचणीत टेस्ट व्हेईकल क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टिमला अवकाशात नेण्यात आलं आहे.
17 किलोमीटरच्या उंचीवर 594 किलोमीटरच्या वेगाने क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टिम वेगळे झाले.
त्यानंतर क्रू मॉड्यूलचे दोन पॅराशूट उघडले. पाण्यापासून अडीच किलोमीटर उंचीवर मॉड्यूलचे मुख्य पॅराशूट उघडताच बंगालच्या खाडीच लँडिंग झालं.
मिशन टीवी-डी-1 बुस्टरला श्रीहरीकोटापासून सहा किलोमीटरपर्यंत बंगालच्या खाडीत पाडण्यात आलं.
क्रू मॉड्यूल श्रीहरीकोटापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर बंगालच्या खाडीत लँड करण्यात आलं आहे. बंगालच्या खाडीतून क्रू मॉड्ऊल आणि येथील एस्केप सिस्टिमची रिकव्हरी होईल.