प्रयागराज : पोलिसांची मोठी सुरक्षा असतानाही अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आले. दोन्ही भावांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी दोन्ही भावांना समोरून गोळ्या झाडल्या. तीन हल्लेखोरांनी ही हत्या केली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अतिक आणि अशरफ यांच्यावर उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. अतिक आणि अशरफ या दोघांसह त्यांचं संपूर्ण कुटुंबच या गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अतिक आणि अशरफची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचंही उघड झालं आहे. एखाद्या अभिनेत्याकडे नसेल एवढी या दोघांकडे संपत्ती असल्याचं उघडकीस आलं आहे.
गँगस्टर ते राजकारणी बनलेल्या अतिक अहमदच्या कुटुंबावर 160 हून अधिक गुन्हे आहेत. त्यातील 100 गुन्हे एकट्या अतिक अहमदविरोधात आहे. तर अशरफ विरोधात 52 गुन्हे आहेत. अतिकच्या पत्नी विरोधात तीन गुन्हे आहेत. त्यांचा मुलगा अलीच्या विरोधात चार, तर दुसरा मुलगा उमर अहमद याच्याविरोधात एक गुन्हा आहे. अतिक अहमद विरोधातील 54 गुन्ह्यांची सुनावणी सध्या वेगवेगळ्या न्यायालयात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिक आणि त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 11,684 कोटी आहे. ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
प्रयागराज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि त्याच्या मित्रांनी 751 कोटीच्या संपत्तीवर जबरदस्ती कब्जा केला होता. गँगस्टर अॅक्टच्या नियमानुसार बसपा नेता प्रवीण याची 8 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ही संपत्ती जप्त केली आहे. तसेच ईडीने अतिकच्या घरी धाड मारली होती. त्यावेळी 200 बँक खाते आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीशी संबंधित कागदपत्रे ईडीला मिळाले होते. तर अशरफकडे 27.33 कोटीची संपत्ती होती. पोलिसांनी ही संपत्ती जप्त केली आहे.
अतिक अहमदचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याची चर्चा होती. पोलिसांनी एक चार्जशीट दाखल केली होती. त्यात अतिक अहमद याचे लश्कर ए तोयबा आणि आयएसआयशी संबंध असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. स्वत: अतिकनेही ही कबुली दिली होती. याशिवाय अशरफच्या विरोधात अपहरणासह इतर विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.