नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी आता शहनाई वाजणार आहे. गौतम अदानी यांच्या लहान मुलाचे लग्न ठरले आहे. गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी (Jeet Adani) याचा साखरपुडा नुकताच झाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, हिरा व्यावसायिकाची मुलगी दीवा जैमिन शाह (Diva Jaimin Shah) अदानी यांच्या घराची सून होणार आहे. या दोघांचे लग्न कधी होणार आहे, यासंदर्भात अजून अधिकृत माहिती दिली गेली नाही.
रविवारी 12 मार्च 2023 रोजी गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा दिवा शाहासोबत साखरपुडा झाला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका खाजगी समारंभात दोघांचा साखरपुडा पार पाडला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. अदानी यांची भावी सून दिवा शाह ही C.Dinesh & Co. Pvt. Ltd कंपनीचे मालक जैमिन शाह यांची मुलगी आहे.
कोण आहे जीत अदानी
गौतम अदानी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि लहान मुलाचे नाव जीत अदानी आहे. जीत अदानी याचा जन्म ७ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. त्याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. 2019 मध्ये जीत भारतात परतला. जीत अदानी आणि त्याचा मोठा भाऊ करण दोघांनीही विदेशातून पदवी घेतली. त्यानंतर करणप्रमाणे जीत वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागला. Jeet Adani हा 2019 मध्ये Adani Group ग्रुपमध्ये वडिलांबरोबर काम करु लागला. जीत अदानीला 2022 मध्ये अदानी ग्रुपचे व्हाइस प्रेसीडेंट (फायनान्स) नियुक्त केला गेला.
अदानी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. या समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आहेत. अदानी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, वीज निर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण आणि कोळसा खाण या व्यवसायात गुंतलेला आहे.
करणचे २०१३ मध्ये झाले लग्न
यापूर्वी, गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करणचा विवाह सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी हिच्याशी झाला होता. करण अदानी आणि परिधी यांचा विवाह २०१३ मध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले होते. करण अदानी सध्या अदानी पोर्ट अँड SEZ लिमिटेडचे सीईओ आहेत.