भोपाळ : गेल्या काही महिन्यांपासून वादात अडकलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यासमोरी अडचणींचा डोंगर काही कमी होताना दिसत नाहीये. बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. ही महिला उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. एक महिन्यापासून ती पतीसोबत बागेश्वर धाममध्ये राहत होती. तिला किडनीचा आजार होता. उपचारासाठी ती बागेश्वर धाममध्ये आली होती. पण तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे ही महिला बागेश्वर धाममध्ये आली होती. बागेश्वर धाममध्ये आल्यानंतर तिला बरं वाटू लागलं होतं. मात्र, अचानक तिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिचा मृत्यू झालाय, असं या महिलेच्या पतीचं म्हणणं आहे. बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर पत्नीची श्रद्धा होती. त्यामुळेच तिला बागेश्वर धाममध्ये आणण्यात आलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही घटना ताजी असतानाच बागेश्वर धामच्या प्रेत दरबारातून एक तरुणी गायब झाली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील देवकली जयराम येथील ही तरुणी आहे. नीरज मौर्या असं या मुलीचं नाव आहे. तिच्या वडिलांचं नाव ओमप्रकाश मोर्या असं आहे. गेल्या 12 फेब्रुवारी 2023पासून म्हणजे चार दिवसांपासून ही मुलगी गायब आहे.
प्रेत दरबार बागेश्वर धाममधून आपली मुलगी गायब झाली आहे, असं या मुलीच्या वडिलाने सांगितलं. मुलीच्या बाबतीत कुणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ तिची माहिती द्या, असं आवाहन या मुलीच्या वडिलांनी लोकांना केलं आहे.
दरम्यान, आपल्या मनशक्तीद्वारे आपण दरबारातील कोणत्याही व्यक्तीचं नाव, गाव आणि त्याचा पत्ता सांगू शकतो. तो कशासाठी दरबारात आला याची माहिती देऊ शकतो, असा दावा बागेश्वर बाबा यांनी केला होता. आपल्या गुरुंकडून आपल्याला दिव्यशक्ती मिळाल्याचा दावाही बागेश्वर बाबा यांनी नागपूरमध्ये आले असता केला होता. अंनिसचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा यांचा हा दावा फेटाळून लावला होता.
तुम्ही नागपूरमध्ये तुमच्या दिव्यशक्तीने आम्ही सांगू त्या लोकांची कुंडली सांगा तुम्हाला लाखोंचं बक्षीस देऊ. इतकेच नव्हे तर अंनिसच्या कार्याला टाळंही लावू, असं आव्हान श्याम मानव यांनी दिलं होतं. बागेश्वर बाबा यांनी हे आव्हान स्वीकारलं होतं. पण नागपूर ऐवजी रायपूरला आल्यावरच दिव्यशक्तीचा प्रयोग करू असं बागेश्वर बाबा म्हणाले होते. पण तुमच्या लोकांच्या पहारा आणि संरक्षणात नको, असं श्याम मानव यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, बागेश्वर बाबा वादात अडकल्यानंतरही त्यांची लोकप्रियता काही कमी झाली नाही. अनेक हिंदू नेते आणि भाजपच्या नेत्यांनी बागेश्वर बाबांची बाजू उचलून धरली आहे. एवढेच नव्हे तर बागेश्वर बाबांच्या दरबारात केवळ भाजप नेतेच नाही तर काँग्रेसचे नेतेही येताना दिसत आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही बागेश्वर बाबांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.