पणजी | महाराष्ट्र काँग्रेस आणि गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज पणजी येथे भेट झाली. तब्बल दीड तास चाललेल्या या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या बाबत आता आडाखे बांधले जात आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला अधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले ट्वीटदेखील जास्त सांकेतिक आहे. त्याचेही वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. गोव्यात काँग्रेसने विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने काँग्रेससमोर युतीचा पर्याय ठेवला होता. मात्र काँग्रेसने तो नाकारला. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी सरकारची शक्यता मावळल्याची चिन्ह होती. त्यानंतर गोवा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे.. मात्र आता काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांच्या भेटीमागील प्रयोजन नेमके काय आहे, यावर चर्चांना उधाण आले आहे.
हम… pic.twitter.com/dQOkOZZy3N
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2022
पणजी येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचा फोटो शेअर केला असून फक्त ‘हम’.. एवढा एकच शब्द लिहिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असून काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मात्र संजय राऊत यांच्या या ट्वीटचा अर्थ काय निघेल, काँग्रेसला शिवसेनेचा पाठींबा असेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या भेटीत नेमक्या कोणत्या मुदद्यांवर चर्चा झाली, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकार ज्या पद्धतीने सूड बुद्धीने राजकारण करते आहेत, त्यावर आमच्यात चर्चा झाला. केंद्र सरकारला उत्तर कसं द्यायचं त्याची एक रणनीती आम्ही तयार केली. केंद्राच्या सूड बुद्धीच्या राजकारणाला उत्तर देण्याची भूमिका काय असेल यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली.’
दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीत प्रवास करताना दिसले, त्यावरही प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, दोन पक्षातले नेते एकत्र आलेत, त्याला वेगळेच समीकरण म्हणता येणार नाही. या दोन नेत्यांच्या एकत्र असण्यात काँग्रेसचा नेताही हवा होता, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.
नाना पटोले गोव्यात विवांता हॉटेलमध्ये थांबल असून तेथेच त्यांची आणि संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘होय आमची गोव्यात भेट झाली. माझ्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते. पण आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा केली. या भेटीमुळे पक्षांतर्गत आहेत, ती समीकरणं अधिक घट्ट झाली आहेत. गोव्यात काँग्रेसचे पूर्णपणे राज्य येईल, अशी शक्यता आहे. नाना पटोले आणि माझ्यात दीड तास चर्चा झाली. आम्ही अनेक विषयांवर बोललो. नाना पटोले एक पूर्णपणे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. मी आणि नाना दोन वेगळे व्यक्तीमत्त्व एकत्र येतील तेव्हा आणखी एक वेगळे व्यक्तीमत्त्व तयार होईल.’
इतर बातम्या-