नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यात मसाल्यांच्या डब्यातील जिरे भाव (Cumin Seed Price) खाऊन गेले आहे. जिऱ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जणू सोनेच हाती आले आहे. बाजारात सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या घरात आहे. पण जिऱ्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड (New Record) मोडले आहे. दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत जिऱ्याने सर्वांनाच ठसका लावला आहे. ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. अवघ्या तीन महिन्यात जिऱ्याच्या किंमती तीन पट वाढल्या आहेत. ‘ऊंट के मुंह में जीरा’ ही म्हण तुम्ही कधी तरी ऐकलीच असेल. एखादी गोष्ट गरजेपेक्षा कमी मिळाली तर ही म्हण वापरण्यात येते. प्रत्येक फोडणीला आठवण देणारे जिरे पण कमीच बाजारात आल्याने किंमती गगनावरी गेल्या आहेत. एका किलो जिऱ्याचा नवीन भाव इतका झाला आहे.
असा वाढला भाव
नवीन वर्षात जिरे गगनाला भिडले. यावर्षी मार्च 2023 मध्ये जिरे 280 प्रति किलो, एप्रिल महिन्यात 350 रुपये किलो तर मे महिन्यात 500 रुपये किलो, जून महिन्यात 700 रुपये किलोवर पोहचले आहे. काही व्यापाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, जिरे दिवाळीत 800 रुपये किलोवर पोहचू शकते.
उत्पादनच घटले
यंदा 40 लाख पोती जिऱ्यांचं उत्पादन झाले आहे. तर आतापर्यंत 25 लाख पोती जिऱ्यांची विक्री झाली आहे. येत्या काही दिवसांत जिरे सोन्याच्या भावाने विक्री होईल. सोन्यापेक्षा जिऱ्याचा भाव जास्त राहणार आहे. जिऱ्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर किचनच्या मसाल्यामधून जिरे गायब होईल.
शेतकऱ्यांच्या हाती लागले सोने
राजस्थानसह इतर ठिकाणी जिऱ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती सोनं लागलं आहे. यंदा अनेक राज्यात उन्हाच्या झळा बसल्या. परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. जिरे उत्पादन घटले. त्याचा फटका बसला. उत्पादनच घटल्याने जिऱ्याचे भाव तीनच महिन्यात तीन पटीने वाढले आहे. गेल्यावर्षी एक पोते 20 ते 25 हजार रुपयांना मिळत होते. यंदा हा भाव 50 ते 60 हजार रुपयांवर पोहचला आहे.
राजस्थान आणि गुजरातचे जिरे सर्वोत्तम
संपूर्ण जगात राजस्थान आणि गुजरातचे जिरे भाव खाऊन जाते. गुणवत्ता आणि चवीसाठी हे ओळखल्या जाते. चीन आणि बांग्लादेश सर्वाधिक जिरे खरेदी करतात. हवामान बदलाचा परिणाम जिऱ्यावर पडला आहे. उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. जिरे व्यापारी मंडळाने दरवाढी मागे उत्पादनात आलेली घट असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी 80-90 लाख पोती उत्पादन झाले होते. यंदा हे उत्पादन 50 लाख पोत्यांवर आले आहे.