युरोपमधील आर्थिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली देश कोणता असेल तर तो जर्मनी आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांच्यात भेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारत दौऱ्यावर आले आहेत. पीएम मोदींनी जर्मनीच्या या घोषणेची माहिती दिली. जर्मनीने भारतीयांसाठी नोकरीची बाजारपेठ खुली केली आहे. जर्मन सरकार आता दरवर्षी ९० हजार भारतीयांना वर्क व्हिसा देणार आहे. आतापर्यंत या श्रेणीत 20 हजार भारतीयांना व्हिसा मिळत होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत व्हिसाच्या संख्येतही वाढ होऊ शकते.
18 व्या आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस (APK- 2024) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर्मनीने प्रशिक्षित भारतीयांसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या व्हिसाची संख्या 20 हजारांवरून 90 हजार करण्याचा निर्णय घेतलाय. मला विश्वास आहे की यामुळे जर्मनीसाठी देखील नवी चालना मिळेल. जर्मनी ही केवळ युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था नाही, तर युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत त्याच्या आर्थिक विकास दराची शक्यता देखील सर्वोत्तम आहे.
युरोपातील इतर देश आर्थिक मंदीच्या समस्येशी झुंज देत असताना, जर्मनी मात्र मजबूत स्थितीत आहे. त्यांना वेगवान आर्थिक विकास दराचा वेग कायम ठेवण्यासाठी काम करणाऱ्यांची गरज आहे. चॅन्सेलर स्कोल्झ यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध दृढ करण्याला देखील प्राधान्य दिले आहे.
भारतात येण्यापूर्वी स्कोल्झ यांच्या मंत्रिमंडळाने फोकस ऑन इंडिया नावाच्या फॉर्मला मान्यता दिली आहे. भारत हा असा दुसरा देश आहे ज्याच्याशी जर्मनीने संबंधांबाबत विशेष दस्तऐवज जारी केला आहे. या फॉर्ममध्ये भारतातील कुशल आणि व्यावसायिक कामगारांना जर्मनीमध्ये संधी उपलब्ध करून देण्याबाबत तपशीलवार उल्लेख करण्यात आलाय. गेल्या चार-पाच वर्षांपासून जर्मनी भारतीय कामगारांना आकर्षित करत आहे. त्यामुळे तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची संख्या दुप्पट होऊन २.५० लाख झाली आहे.
चॅन्सेलर स्कोल्झ म्हणाले, ‘जर्मन विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात 23 हजार भारतीय व्यावसायिकांनी जर्मनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय विद्यार्थी आणि कामगारांना त्वरीत व्हिसा देण्यावर भर दिला जाईल, असे ते म्हणाले.
जर्मनीचे कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्री ह्युबर्टस हेल म्हणाले की, ‘जर्मनीला दरवर्षी चार लाख व्यावसायिक कामगारांची गरज असते आणि यातील मोठी संख्या भारतातून घेतली जाईल. भारतीय कामगारांचा जगभरात आदर केला जातो आणि जर्मनीचा अनुभव खूपच चांगला आहे. गुरुवारी भारत आणि जर्मनीमध्ये कामगार आणि रोजगाराशी संबंधित आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.