गुजरातमधील अहमदाबादमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले आहे. एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने मिळाले आहे. 87.9 किलो सोने, 11 लग्झरी घड्याळे आणि मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली आहे. ही रोकड मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली आहे. विदेशातून तस्करी करुन हे सोने आणल्याचा संशय आहे. या प्रकरणात सर्व बाजूंनी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अहमदाबादमधील एका अपार्टमेंटमधून 100 कोटी रुपये किंमतीचे 87.92 किलो सोने मिळाले. या छापेमारीत लग्झरी घड्याळे, रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे. 19.6 किलो सोन्याची ज्वेलरी, कोट्यवधी रुपये किंमतीच्या 11 महाग घड्याळी आणि 1.37 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. रोकड मोजण्यासाठी डीआरआयला नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली.
तपास संस्थांना मिळालेल्या गुप्त सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी अहमदाबादमधील पालडी भागात असलेल्या एका फ्लॅटवर छापा टाकला. त्या छाप्यात 87.92 किलो सोने मिळाले. त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. त्यातील बहुतांश सोन्यावर विदेशी चिन्ह आहे. हे सोने भारतात तस्कारी करुन आणले गेले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, छापा टाकण्यात आलेले अहमदाबाद अपार्टमेंटमधील फ्लॅट मेघ शाह यांनी भाड्याने घेतला होता. तेच या खजिन्याचा संभाव्य मालक असू शकतात. त्यांचे वडील महेंद्र शाह दुबईत असतात. ते शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांनी आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक (एटीएस) सुनील जोशी यांनी सांगितले की, पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तपास संस्थांची टीम त्या फ्लॅटवर छापेमारीसाठी गेली तेव्हा कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाह यांच्या एका नातेवाईकांकडून चावी घेतली. त्या नातेवाईकांचीही चौकशी डीआरआयचे अधिकारी करीत आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय तस्करीचे आहे का? त्याचाही तपास करण्यात येणार आहे.
महेंद्र शाह हे गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मूळचे रहिवाशी आहेत. मात्र अनेक वर्षांपासून ते मुंबईत स्थायिक आहे. त्याचा व्यवसाय दुबईपर्यंत विस्तारला आहे. ते दुबईला येत-जात राहतात. छापेमारीनंतर गुजरात एटीएसने संपूर्ण प्रकरण डीआरआयकडे सोपवले असून पुढील कारवाई डीआरआय करणार आहे.