गुजरात आणि हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी? भाजप VS काँग्रेस VS आप, काही तासांत चित्र होणार स्पष्ट

| Updated on: Dec 07, 2022 | 11:47 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम राहणार की, काँग्रेस आणि केजरीवाल काही कमाल करणार ? याकडे देशाचं लक्ष आहे.

गुजरात आणि हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी? भाजप VS काँग्रेस VS आप, काही तासांत चित्र होणार स्पष्ट
Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात निवडणूक निकाल एका क्लिकवर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गांधीनगर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कोणाची सत्ता येणार, याचा निकाल काही तासांत स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम राहणार की, काँग्रेस आणि केजरीवाल काही कमाल करणार ? याकडे देशाचं लक्ष आहे. गुजरातमध्ये कोण? हिमाचलमध्ये प्रदेशमध्ये कोण ? याचा फैसला काही तासांत समोर येणार आहे. विशेषत: गुजरातकडे फक्त गुजरातच्याच नागरिकांचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण होमटाऊनमध्ये, पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलीय. एक्झिट पोलमध्ये तरी गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलेल असा अंदाज आहे.

गुजरातमध्ये एकूण 182 जागा असून बहुमतासाठी 92 जागा हव्यात. भाजपला 125 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल अशी शक्यता आहे. काँग्रेसला 40-50 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर केजरीवालांची आम आदमी पार्टी तिसऱ्या स्थानी राहू शकते. आपला 3-5 जागा तर इतरांना 3 ते 7 जागा मिळतील, असं भाकीत आहे.

विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसपेक्षा आम आदमी पार्टीनं जोरदार प्रचार केला. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांनी गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावली. पण विकासाच्या मुद्द्यांपेक्षा, गुजरातच्या निवडणुकीत वैयक्तिक टीका टिप्पणीच अधिक गाजली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे नेते मधुसूदन मिस्त्रींनी आधी मोदींना औकात दाखवण्याची भाषा केली. नंतर काँग्रेसचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी मोदींना रावण म्हटलं. त्यामुळं मोदींनी गुजराती मतदारांना अशा टीकाकारांना EVM मधून उत्तर देण्याचं आवाहन केलं होतं.

गुजरातमध्ये EVM मशिनमधून जेव्हा मतांची मोजणी सुरु होईल, तेव्हा रेकॉर्ड बनणं सुरु होईल. दरम्यान, भाजपनं गुजरातमध्ये बहुमतं मिळवलं तर, भाजप सलग 7 वेळा सत्तेत येईल. आणि आम आदमी पार्टीला गुजरातमध्ये अवघी 7 टक्के मतं जरी मिळाली तरी आपची राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंद होईल.

इकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे. एक्झिट पोलनुसार, हिमाचलमध्ये एकूण 68 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 32 ते 34 आमदार निवडून येतील असा अंदाज आहे. काँग्रेसला 30 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अपक्षांना 3 ते 5 जागांची शक्यता आहे.

गुजरात असो हिमाचल प्रदेश, सध्या दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्यामुळं सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. तर सध्या कठीण काळातून जात असलेली काँग्रेस हिमाचलमध्ये काही कमाल करते का ? हे काही तासांच स्पष्ट होईल.