अहमदाबाद: गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते हार्दीक पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी सकाळी 9 वाजताच अहमदाबाद येथील रानिप येथील निशान स्कूलमध्ये मतदान केलं. मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांना भेटण्यासाठी पायी चालत त्यांच्या घरी गेले. त्यानंतर मोदींनी मीडियाशी संवाद साधला. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील लोकांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. मी देशातील जनतेचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. मी निवडणूक आयोगाचा आभारी आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. शांततापूर्ण वातावरणात मतदान करण्याची भारताची परंपरा निवडणूक आयोगाने विकसित केली आहे. नियोजनद्ब कामाबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन. लोकशाहीचा उत्सव आणि उत्साहासाठी मी जनतेचे अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सोमाभाई हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू आहेत. ते अहमदाबादच्या राणिपमध्ये राहतात. येथील एका छोट्या घरात ते राहतात. सोमाभाई 75 वर्षाचे आहेत. मोदीलोक आरोग्य विभागातून निरीक्षक पदावरून सोमाभाई निवृत्त झालेले आहेत. अत्यंत साधं आयुष्य जगणारे सोमाभाई मोदींना बऱ्याच वर्षानंतर भेटले आहेत. सोमाभाई राजकारणात सक्रिय नाही. ते मोदींबाबत मीडियाशी कधीच काही बोलत नाहीत.
गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. 14 जिल्ह्यातील 93 जागांवर हे मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यपासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सकाळी 8 ते 10 या दोन तासात गुजरातमध्ये 4.75 टक्के मतदान झालं आहे.