अहमदाबाद: गुजरातमध्ये मुसळधार ( Gujrat Flood ) पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पूरस्थिती तयार झाली आहे. अनेक लोक या पुरात अडकले आहेत. रस्त्यांवर वाहून जाणाऱ्या गाड्या, पाण्यात बुडालेली घरं आणि मदतीची वाट पाहणारे लोक हेच चित्र सध्या गुजरातमध्ये दिसत आहे. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की रेस्क्यु ऑपरेशनसाठी हेलकॉप्टरचीही मदत घ्यावी लागत आहे. ( Gujarat floods after heavy rains, Rescue operation started by NDRF in Jamnagar, Rajkot Weather Report)
गुजरातच्या कुठल्या भागाला पुराचा फटका
गुजरातच्या जामनगर, राजकोट, जुनागडमध्ये तुफानी पाऊस झाला आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. सर्वात वाईट परिस्थिती ही जामनगरची पाहायला मिळते आहे. जामनगरमध्ये तब्बल 35 गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. NDRFची 6 पथकं इथं रवाना करण्यात आली आहेत. हेच नाही तर हवाई दलाची 4 हेलिकॉप्टर्सही बचाव कार्य करत आहेत. पुराच्या पाण्यात फसलेल्या लोकांची प्रशासनाकडून सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जामनगरमध्ये पुराची परिस्थिती का ओढावली?
सततच्या मुसळधार पावसाने जामनगर जिल्ह्यातील 18 धरणं आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा बहुतांश भाग हा पाण्याखाली गेला आहे. कित्येक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं आहे. पुरापासून वाचण्यासाठी अनेकांनी घरांच्या छतावर आसरा घेतला आहे. मात्र, मुसळधार पाऊस काही थांबत नाही आहे, आणि पुराचं पाणी सतत वाढत आहे. त्यामुळे अनेकजण दहशतीत आहे. त्यांनाच सोडवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून केलं जातं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहे, अनेक नद्या आपलं पात्र सोडून वाहत आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी भीषण झाली आहे. नद्यांची वाढलेली पाणी पातळी पाहता अनेक गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. हेच नाही तर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
अजूनही मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हेच नाही तर वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. समुद्र या काळात खवळलेला आहे, त्यामुळे समुद्रात गेलेल्या 600 मच्छिमारांना परत बोलावण्यात आलं आहे. वादळी पाऊस थांबेपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाकडून मच्छिमारांना देण्यात आला आहे.
अजूनही मुसळधार पावसाचा इशारा
पावसामुळे जामनगरच नाही तर राजकोटमध्येही परिस्थिती भीषण आहे. राजकोटच्या अनेक भागात पूर आला आहे. त्यामुळे दोरीच्या मदतीने पुरात फसलेल्या लोकांची सुटका केली जात आहे. पाऊस थांबण्याची आशा लोकांना आहे, मात्र हवामान विभागाने ( IMD ) पुन्हा एकदा चिंते भर टाकली आहे. पुढच्या 4-5 दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. विशेष करुन जामनगर, जुनागढ, पोरबंदर, द्वारका, ओखा आणि राजकोटमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हेच नाही तर अनेक भागात वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
संबंधित बातम्या: