मोरबी (गुजरात) : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडलीय. केबल ब्रिज तुटल्याने पुलावर उभे असलेले अनेक जण नदीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुलाची केबल तुटल्याने हा पूल कोसळला. दुर्घटनेवळी पुलावर 150 जण उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
मोरबी शहरातील माच्छू नदीवर हा झुलता पूल होता. या पुलाचं पाच दिवसांपूर्वीच नुतीनीकरण करण्यात आलं होतं. तसेच तीन दिवसांपूर्वी हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आज हा पूल मच्छू नदीत कोसळला.
पुलाचं नुकतंच नुतनीकरण झालेल असताना ही दुर्घटना नेमकी का घडली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण पुलावर गर्दी जास्त असल्याने तितकं वजन पूल पेलू न शकल्याने ही दुघर्टना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पूल ज्यावेळी नदीत कोसळला त्यावेळी पुलावर असणाऱ्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त होती.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी देखील या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली होती.”ही खूप दुर्देवी घटना आहे. आज संध्याकाळी जवळपास साडेसहा वाजेच्या सुमारास मोरबीमध्ये पूल कोसळला.दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर 150 जण होते. घटनेनंतर 15 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान, जिल्हाधिकारी, जिल्हा एसपी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते. मी देखील थोड्या वेळात तिथे पोहोचतोय”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली होती.
पूल कोसळून नदीत पडलेल्यांचा शोध सुरु आहे. पूल कोसळल्यानंतर या प्रकरणी चौकशीची मागणी होऊ लागली आहे. त्यानंतर चौकशीसाठी एसआयटीचीदेखील स्थापना झाली आहे. राज्य सरकारने मृत्यांच्या कुटुंबियांसाठी चार लाखांची मदत जाहीर केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केलीय.