विश्वास ठेवणे अवघड आहे, परंतु सिगारेट बट्समधून कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर अनेक जणांचे ‘नाही’ असे असणार आहे. परंतु तुमची जर वेगळा विचार करण्याची तयारी असेल तर ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असा प्रकार होऊ शकतो. कोट्यवधींची कमाई कचऱ्यात फेकून देणाऱ्या सिगारेट बट्समधून होऊ शकते. नवी दिल्लीतील युवा उद्योजक नमन गुप्ता यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांच्या कंपनीत कचऱ्यात फेकणाऱ्या सिगारेट बट्समधून खेळणी, कपडे आणि पेपर तयार केले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. या उद्योगात त्यांच्यासोबत अडीच हजार कर्मचारी आणि वितरकांची साखळी आहे.
नमन गुप्ता यांनी सिगारेट बट्सपासून व्यवसाय सुरु करण्याची कल्पना कशी आले? त्याची आठवण सांगताना म्हणतात, बालपणापासून माझे चार्टर्ड अकाउंटन्ट होण्याचे स्वप्न होते. 2013-14 मध्ये बारावी झाल्यानंतर मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी महाविद्यालयातील युवकांमध्ये सिगारेट ओढण्याचा ट्रेंड असल्याचे लक्षात आले. मी अजूनपर्यंत कधी सिगारेट ओढली नाही. परंतु सिगारेट ओढल्यानंतर राहिलेला भाग म्हणजे बट्सकडे माझे लक्ष गेले. अनेक जण सिगारेट ओढल्यानंतर बट्स पायाखाली रगडून पुढे निघून जातात, हे मी पाहिले. त्यावेळी त्याबाबत विचार सुरु केला. त्यानंतर 2018 मध्ये कॉलेजच्या अंतिम वर्षात होतो. त्यावेळी सिगारेटचे एक बट्स उचलून पाहिले. त्याच्यावर चार महिने रिसर्च केला. त्यानंतर लक्षात आले की त्यात फायबर आहे. ते फायबर वर्षानुवर्ष सडत नाही.
2018 मध्ये नमन गुप्ता यांनी कोड एफर्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. नमन गुप्ता म्हणतात, माझा भाऊ विपूल गुप्ता हा इंजिनिअर आहे. माझे कॉमर्सचे शिक्षण झाले आहे. मी भावाला म्हटले, सिगारेट बट्स रिसायकल करुन काही बनवता येईल का? त्यानंतर आम्ही दोघांनी त्यावर रिसर्च सुरु केला. त्यापासून काय, काय बनवता येईल, त्याचा विचार सुरु केला. त्यावेळी समजले कापसासारखे सॉफ्ट मटेलियल तयार होत आहे. त्यामुळे त्यापासून खेळणी बनवण्याचे काम करता येईल, असे लक्षात आले. मग कंपनीत सिगारेटच्या कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यातून उपयुक्त उत्पादने बनवली जात आहेत. त्यासाठी सिगारेटच्या बट्समधून कागदाचे आवरण वेगळे काढले जाते. त्यानंतर त्यापासून लगदा तयार करून त्यात ऑरगॅनिक बाइंडर मिसळले जाते. यापासून मॉस्किटो रिपेलेंट कार्ड बनवले जातात. ते जाळल्याने डास येण्यापासून बचाव होतो. सिगारेटच्या बट्सपासून कागद आणि फायबर वेगळे केले जातात. कागदापासून मॉस्किटो रिपलेंट बनवली जातात. तसेच फायबरपासून उशी, कुशन, टेडी बनवले जात आहे. फायबरपासून बायोडिग्रेडेबल ऑर्गेनिक केमिकल प्रक्रिया केली जाते. जवळपास 24 ते 36 तास केमिकल्सची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते बाहेर काढून पाण्याने धुऊन काढली जातात. मग सॉफ्ट टॉय, उशी, टेडी इत्यादी बनवण्यासाठी वापरली जाते.
सर्वात महत्वाचा प्रश्न होता, सिगारेट बट्स मिळवणार कसे? मग त्यासाठी नमन गुप्ता यांनी तीन पर्यायांवर काम सुरु केले. सर्व पानटपरी आणि सिगारेट विकणाऱ्या दुकानांवर कलेक्शन बॉक्स लावले. मोठ मोठ्या कंपन्या आणि स्मोकींग झोनमध्ये सिगारेट बट्स टाकण्यासाठी कलेक्शन बॉक्स ठेवले. त्या ठिकाणी पंधरा दिवसांत त्यांची टीम जाऊन कलेक्शन करु लागली. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून वेस्ट मॅनेजमेंट पॉलीसीनुसार पैसे मिळू लागले.
कचरा वेचणाऱ्यांकडून सिगारेट बट्स जमा करु लागले. त्यांना त्यासाठी प्रत्येक किलोमागे 250 रुपये त्या लोकांना दिले जात होते. वेस्ट कलेक्शनचे तिसरे मॉडेल म्हणजे वेगवेगळ्या राज्यात असलेले वेंडर्स होते. या वेंडर्सकडून सिगारेट बट्स जमा करु लागलो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसह देशातील 15 राज्यांमध्ये आमचे वेंडर असल्याचे नमन गुप्ता यांनी सांगितले.
नमन गुप्ता यांनी 2018 मध्ये या उद्योगाला सुरुवात केली. तेव्हा 20 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी वडिलांकडून घेतली. वडिलांकडून नेहमीच त्यांना प्रोत्साहन मिळत राहिले. मग सिगारेट बट्स रिसायकल करुन कापूस तयार करु लागले. त्या कापसापासून सॉफ्ट टॉय बनवू लागले. परंतु त्याचे मार्केट इतके मोठे नव्हते. मोबाईलमुळे मुले सॉफ्ट टॉयकडे वळत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे कंपनी सुरु केल्यावर पहिली तीन वर्षे तोटा झाला. त्यामुळे दुसरा पर्यायांवर नमन गुप्ता यांनी विचार सुरु केला. मग 2021 मध्ये घरी सजवण्यात येणारे डेकोरेट आयटम्स बनवणे सुरु केले. तसेच पेपर आणि कापड यासारखे प्रॉडक्टही तयार करु लागले. सॉफ्ट टॉय आणि डेकोरेट आयटम्स महिला घरी बसूनच बनवतात. त्यामुळे त्यांना घरीच रोजगार मिळू लागला.
बाजारात सॉफ्ट टॉयची मागणी कमी झाल्यावर पेपर, डेनिम कपडे तयार करु लागलो. त्यामुळे मोठे कॉर्पोरेट हाऊस त्यांचे ग्राहक झाले. त्यामुळे व्यवसाय तीन पट वाढला. आता 50 पेक्षा जास्त कार्पोरेट हाऊस नमन गुप्ता यांच्या उद्योगासोबत जुळले गेले आहेत. ‘B 2 B’ म्हणजे ‘बिझनेस टू बिझनेस’ असा त्यांचा व्यवसाय आहे. रोज दीड टन म्हणजे 70 लाख सिगारेट बट्स रिसायकल केली जात आहे. व्यवसाय 100 कोटींपेक्षा जास्त होत आहे. देशात सिगारेट बट्सच्या केवळ दोन टक्के सिगारेट बट्सवर प्रक्रिया होत आहे. यामुळे या व्यवसायात करण्यासारखे खूप काही आहे. गेल्या सहा वर्षांत 10 बिलियनपेक्षा जास्त सिगारेट त्यांच्या कंपनीने रिसायकल केल्या आहेत.
सिगारेट बट्सचे डी-कंपोज करण्यास 10 वर्षांचा कालावधी लागतो. एक किलो सिगारेट वेस्टपासून जवळपास 3000 सिगारेट बट्स तयार होतात. भारतात दरवर्षी तीन कोटींपेक्षा जास्त सिगारेट बट्स निघतात. मग इतके सिगारेट बट्स डी-कंपोज होण्यास किती कालावधी लागणार? याचा विचार कधी केला का? जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाजानुसार भारतात सुमारे 267 दशलक्ष लोक तंबाखूचे सेवन करतात. हे भारतातील प्रौढ लोकसंख्येच्या 30 टक्के आहे. तसेच भारतात दरवर्षी सुमारे 1.35 दशलक्ष लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतात. त्यानंतर सिगारेट आणि तंबाखू, गुटखा हा व्यवसाय देशात वाढत आहे.