वाराणासी: कोर्टाच्या आदेशानंतर अखेर ज्ञानवापी मशिदीतील वजूखाना बंद करण्यात आला आहे. नऊ टाळे लावून वजूखाना सील करण्यात आला आहे. तसेच या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे (crpf) देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे वाराणासीतील (Varanasi) सरकारी वकिलांनी आज आणि 20 मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे आज ज्ञानवापी प्रकरणावर वाराणासी कोर्टात सुनावणी होणार नाही. मात्र, कोर्टाकडून याबाबत कोणतीही अधिकृत निर्देश वा माहिती देण्यात आली नाही. हा संप सांकेतिक आहे. त्यामुळे या संपापासून ज्ञानवापी प्रकरण (Gyanvapi Masjid Case) वेगळं ठेवलं जाव, असं आवाहन वकिलांनी बार कौन्सिलला केलं आहे. दरम्यान, विकलांच्या संपामुळे ज्ञानवापी प्रकरणावर आज सुनावणी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. आज जर या प्रकरणावर सुनावणी झाली नाही तर कोर्ट या प्रकरणावरील सुनावणीची नवी तारीख जाहीर करेल, असं सांगण्यात येत आहे.
24 तासांसाठी वजूखाना सील करण्यात आला आहे. या ठिकाणी सीआरपीएफच्या दोन जवानांना तैनात करण्यात आलं आहे. या जवानांची शिफ्ट ड्युटी असणार आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये दोन दोन जवान या ठिकाणी तैनात राहतील. शिवलिंगाच्या परिसराला नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये मंदिर सुरक्षेचे प्रमुख डेप्युटी एसपी रँकचे मंदिर सुरक्षा अधिकारी आणि सीआरपीएफचे कमांडंट डोळ्यात तेल घालून निरीक्षण करणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
वजूच्या ठिकाणी एक छोटा तलाव आहे. तोही सील करण्यात आला आहे. हा परिसर आधीपासून लोखंडी बॅरिकेड आणि लोखंडी जाळ्यांनी अच्छादलेला आहे. याच ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकार करत आहेत. तर वजू खान्यात शिवलिंग नसून पाण्याचा फव्वारा असल्याचं मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं आहे, असं वाराणासी प्रशासनाने सांगितलं.
दरम्यान, मशिदीच्या वजूखान्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा दुसरा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत या मशिदीशी संबंधित दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोन्ही व्हिडीओ एक दोन महिने जुने असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, वजूखान्यात सापडलेली दगडाची आकृती शिवलिंग आहे की फव्वारा आहे याचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर याच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर वादी आणि प्रतिवादींनी कोर्टात अपिल केलं आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती. वादी पक्षाकडून रेखा पाठक, मंजू व्यास आणि सीता साहू यांनी मंगळवारी कोर्टात अर्ज दिला होता. मशिदीतील कथित शिवलिंगाची पूजा करण्यासाठी परवानगी मिळावी, असं या अर्जात म्हटलं होतं. तसेच वजूखाना आणि नंदीच्या समोरील भुयाराच्या उत्तर आणि पूर्वेकडील भिंत तोडण्याची आणि त्याचाही सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरातील मातीचे ढिगारे बाजूला करण्याची मागणीही करण्यात आली होती.