ज्ञानवापी प्रकरण : तळघरात पूजेला परवानगी, हिंदूंच्या विजयामुळे जल्लोषाचे वातावरण

| Updated on: Jan 31, 2024 | 5:20 PM

बुधवारी न्यायालयाने व्यासजींच्या तळघरात पूजेला परवानगी देण्याबाबत आदेश जारी केला आहे. पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ज्ञानवापी प्रकरण : तळघरात पूजेला परवानगी, हिंदूंच्या विजयामुळे जल्लोषाचे वातावरण
Follow us on

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय आला आहे. कोर्टाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार हिंदूंना आता ज्ञानवापी तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.

ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरातील पूजेशी संबंधित अर्जावर जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला. तळघरात पूजा करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

डीएमच्या ताब्यात होती जागा

फिर्यादीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, व्यासजींचे तळघर डीएमच्या ताब्यात देण्यात आले आहे. वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने नंदीसमोरील बॅरिकेडिंग उघडण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशाने आता लोकांना 1993 पूर्वीप्रमाणे तळघरात पूजा करण्यासाठी ये-जा करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

परवानगी न देण्याची मागणी

मंगळवारी न्यायालयात अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या वतीने वकील मुमताज अहमद आणि इखलाक अहमद यांनी व्यासजींचे तळघर मशिदीचा एक भाग असल्याचे सांगितले होते. तेथे पूजा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही असे म्हटले होते. हे प्रकरण प्रार्थनास्थळ कायद्याच्या आड येते. तळघर ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. त्यामुळे तेथे पूजेला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती.

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने आज हिंदू पक्षाच्या बाजुने निकाल दिला आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. हा हिंदू पक्षाचा मोठा विजय मानला जात असला तरी मुस्लिम पक्ष या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी करत आहे.

ज्ञानवापीच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणाले की, न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. या निर्णयाविरोधात आमच्याकडे उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे ही पूजा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 30 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत येथे पूजा केली जात होती.