नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री उघडले. जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे अधिकार दिले. त्यानंतर वाराणसीच्या ज्ञानवापी तळघरात असलेल्या व्यासजी तळघरात रात्री पूजन आणि आरती झाली. यासंदर्भात न्यायालयाचा आदेश कालच आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच सर्व व्यवस्था करण्यात आली. विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेशवर द्रविड यांनी पूजा केली. यावेळी विभागीय आयुक्त कौशल राज शर्मा, काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उपस्थित होते. नोव्हेंबर 1993 पर्यंत या ठिकाणी पूजा होत होती. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ही पूजा थांबवल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी राजलिंगम म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार पूजा करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचे स्पष्टपणे सांगितले. काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील बॅरिकेडगचा काही भाग हटवण्यात आला आहे. रात्रीपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. संपूर्ण संकुलाचे छावणीत रूपांतर झाले आहे.
बुधवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचे अधिकार दिले होते. न्यायालयाने प्रशासनाला आदेश देत म्हटले होते की, 7 दिवसांत पूजा करण्याची सर्व व्यवस्था करण्यात यावी. हे तळघर मशिदीच्या आत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये या ठिकाणी हिंदू देवी-देवतांची मुर्त्या मिळाल्या. तसेच या ठिकाणी हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे मिळाले. त्यानंतर मध्यरात्री पूजा झाली. गणेश-लक्ष्मीची आरती झाली.
काशी विश्वनाथ ट्रस्टवर ज्ञानवापी तळघरात नियमित पूजा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, 1993 पर्यंत येथे पूजा होत होती. परंतु नोव्हेंबर 1993 मध्ये मुलायम सिंह यादव सरकारने ही पूजा बेकायदेशीरपणे बंद केली. तसेच पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना हटवण्यात आले. मुस्लिम पक्षाने प्लेस ऑफ वर्शिप एक्टचा दाखला देऊन याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका अस्वीकार करत हिंदू पक्षाला ज्ञानवापी तळघरात पूजा करण्याचे अधिकार दिले.