Haldwani Violence | उत्तराखंडच्या हल्द्वानी शहराने गुरुवारी 8 फेब्रुवारीला मोठा हिंसाचार अनुभवला. या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला. 130 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. उपद्रवी समाजकंटकांनी पोलिसांना लक्ष्य केलं. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल, अधिकारी अचानक झालेल्या या हल्ल्यासमोर हतबल होते. या दरम्यान स्फोटाचे आवाज झाले. पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. यामुळे एकाबाजूने आग लागली. एक महिला शिपाई वायरलेस सेटवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत होती. ‘सर आम्हाला वाचवा’ ती बोलत होती, इतक्यात अचानक संर्पक तुटला. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचेपर्यंत पोलीस स्टेशन जळून खाक झालं होतं. या हिंसाचारात 100 पोलीस जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय.
पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. हे दगड पोलिसांना लागत होते. टेबल, खुर्चीखाली लपून पोलिसांनी आपले प्राण वाचवले. डीएम वंदना कुमार यांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. जमाव पोलीस स्टेशनजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली नाही. पण समाजकंटकांनी दगडफेक चालू केली.
पोलीस कठोर पावल उचलू शकत होते, पण….
पोलीस स्टेशनबाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. मीडियाच्या गाड्या होत्या. जमावाने या गाड्या पेटवून दिल्या. छपरावरुन दगड टाकले जात होते. पोलीस जमावाविरुद्ध कठोर पावल उचलू शकत होते. पण वातावरण खराब होऊ नये, म्हणून पोलीस शांत राहिले.
प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह
गुरुवारी दुपारी मलिक का बगीचा येथे बेकायद मदरसा आणि नमाज स्थळ तोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पोहोचले. अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु झाल्यानंतर तासाभराने समाजकंटकांनी पोलीस टीमवर हल्ला केला. हिंसाचारात पोलीसच नाही, सर्वसामान्य लोकही जखमी झाले. या हिंसाचारानंतर प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालय. बनभूलपुरा येथे बेकायद धार्मिक स्थळ तोडताना तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची माहिती प्रशासनाला होती. पण याचा सामना करण्याची तयारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी का नाही केली?