शिक्षकांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षण दिले पाहिजे. परंतु एका शिक्षकाने आपल्या अकलेचे तारे तोडत मुलांना भगवान हनुमानजी संदर्भात वेगळेचे शिक्षण दिले. हनुमानजी मुस्लीम होते ते नमाज अदा करत होते, असे शिक्षण बिहारमधील एका शाळेत शिक्षकाने दिले. बिहारमधील बेगूसराय शाळेतील शिक्षक जियाउद्दीन यांनी मुलांना हे शिक्षण देताच गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बेगूसरायमधील हरिपूर येथील शिक्षक जियाउद्दीन यांनी भगवान हनुमानजी यांच्यासंदर्भात शाळेत पाठ्यक्रमातील शिक्षणाऐवजी वेगळेच शिक्षण दिले. सातवीतील मुलांना हनुमानजी पाच वेळा नमाज अदा करत होते? रामजी त्यांना नमाज शिकवत होते? या प्रकारे शिक्षण दिले.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालक प्रचंड संतापले. त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली. त्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. या शिक्षकांमुळे समाजात द्वेष निर्माण होत असल्याचा आरोप पालकांनी केला. त्यानंतर शिक्षक जियाउद्दीन यांनी माफी मागितली. दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय मंत्री गिरिरारज सिंह यांनी या प्रकरणात बिहार सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या शिक्षकाकडून सामाजिक सौहार्द बिघडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, बीडीओ अभिषेक राज आणि ब्लॉक शिक्षण अधिकारी निर्मला कुमारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी शाळेत पोहचले. त्यांनी शाळेत चौकशी केली. या शिक्षकाने पालकांची जाहीर माफी मागितल्याचे बीडीओने सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान शिक्षकाने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
हिंदू संघटनांनी या प्रकरणात शाळेत जाऊन तीव्र निदर्शने केली. यावेळी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाला ताकीद दिली असल्याचे सांगितले. परंतु पालक आणि विविध संघटनांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.