Haryana Result : हरियाणामध्ये भाजपच्या विजयाची 5 मोठी कारणे

| Updated on: Oct 08, 2024 | 6:46 PM

हरियाणात एक्झिट पोल चुकीचे ठरवत भाजपने जोरदार मुंसडी मारली आहे. भाजपने अवघ्या ५० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ता तिसऱ्यांदा काबीज करण्यात भाजपला यश आले आहे. या यशामागची कारणे कोणती आहेत. भाजपने कशा प्रकारे रणनीती आखली आणि विजय खेचून आणला जाणून घ्या.

Haryana Result : हरियाणामध्ये भाजपच्या विजयाची 5 मोठी कारणे
Follow us on

विविध माध्यमांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल खोटे सिद्ध करत भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण हा अंदाज चुकीचा ठरला आहे. भाजपने राज्यात तिसऱ्यांदा सत्ता काबिज केली आहे. हरियाणात भाजपच्या विजयामागे कोणते 5 घटक होते ते जाणून घेऊयात.

1. खट्टर यांच्या जागी सैनींना केले मुख्यमंत्री

2014 मध्ये हरियाणात भाजप सत्तेवर आल्यानंतर 2019 मध्ये जेजेपीच्या मदतीने युती सरकार स्थापन केले होते. त्यानंतर आता २०२४ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. सलग दोन वेळा सत्तेत राहिल्यास तिसऱ्यांदा सरकारमध्ये येणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे भाजपने रणनीती आखली. मुख्यमंत्री बदलण्याचा डाव खेळला. पंजाबी खत्री मनोहर लाल खट्टर यांच्या जागी त्यांचेच विश्वासू नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. भाजपची ही खेळी यशस्वी झाल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.

2. सैनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी मते भाजपच्या बाजूने झुकली!

नायबसिंग सैनी हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. हरियाणात मुख्यमंत्री होणारे ते ओबीसी समाजातील पहिले व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या समाजातील मतदारांचा भाजपकडे कल वाढला. अहिर, गुज्जर आणि सैनी समुदाय हरियाणात सुमारे 11 टक्के आहेत. ओबीसींची संख्या ३४ टक्के आहे.

3. गैर-जाट मतांचे एकत्रीकरण

काँग्रेसने भूपिंदरसिंग हुड्डा यांना उमेदवार ठरवताना जास्त महत्त्व दिल्याने निवडणुकीत जाट विरुद्ध गैर-जाट ध्रुवीकरण झाले. ओबीसी समाजातील पहिला मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या रूपाने देऊन भाजपने ओबीसींना आपल्याकडे खेचले. त्याचा फायदा पक्षाला झाला. हरियाणा हे जाटबहुल राज्य असून तेथे सुमारे ३० टक्के जाट समाज आहे. दुसरीकडे मागासवर्गीय मतदारांची संख्या अंदाजे 34 टक्के आहे. याशिवाय 17 टक्के दलित आहेत. काँग्रेसमध्ये जाट समाजाला दिलेल्या महत्त्वामुळे बिगर जाट मतदारांचा कल भाजपकडे वाढला. त्याबाबत जाट मतदारांमध्ये नाराजी असल्याचे भाजपला कळून चुकले होते. निवडणुकीपूर्वी, भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षापासून स्वतःला दूर केले, ज्याचा मूळ मतदार जाट आहे. त्याचा फायदाही भाजपला झाला.

4. नवीन उमेदवारांना तिकिट

भाजपने मुख्यमंत्री तर बदललाच पण स्थानिक आमदार देखील बदलले. सत्ताविरोधी प्रवृत्ती आणि मतदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपने नवे उमेदवार उभे केले. यामुळे पक्षाला काही जागांवर बंडखोरीला सामोरे जावे लागले मात्र पक्षाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. याचा फायदा भाजपला निवडणुकीतही झाला आणि त्यामुळे सत्ताविरोधी ताप कमी होण्यास मदत झाली.

5. दलित मतांवर लक्ष केंद्रित केले

हरियाणात काँग्रेसला विजयाची खात्री होती आणि भाजपलाही मार्ग सोपा नसल्याची कल्पना होती. पण काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भाजपने फायदा करुन धेचलाय भूपेंद्र सिंह हुडा विरुद्ध कुमारी सेलजा यांच्यातील लढतीला काँग्रेसमध्ये चांगलीच हवा मिळाली. तिकीट वाटपात हुड्डा यांना महत्त्व दिल्याने सेलजाही अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी प्रचारापासून स्वतला दूर ठेवले. अनुभवी असून देखील दलित चेहरा असलेल्या सेलजा यांचा काँग्रेसमध्ये अपमान होत असल्याचा प्रचार भाजपने केला. पक्षाने दलितांना मिर्चपूरच्या घटनेची आठवण करून देत काँग्रेस सत्तेवर आल्यास त्यांच्या समाजावर अत्याचाराचा काळ सुरू होऊ शकतो, असा इशाराही दिला होता. परिणामी दलित मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळताना दिसले.