हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजप स्वबळावर स्थापन करणार आहे. भाजपला हरियाणात ४८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करताना मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकार कधी स्थापन होणार आणि नवीन सरकारची रचना काय असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सरकार स्थापनेबाबत नायब सैनी म्हणाले की, अद्याप तारीख ठरलेली नाही. विजयादशमीच्या दिवशी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सरकारच्या रचनेबाबतही चर्चा सुरु आहे. कारण सध्याच्या सरकारच्या मंत्र्यांबद्दल जनतेची नाराजी आहे. सरकारचे 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजप सरकारमध्ये नव्या लोकांना संधी मिळणार आहे.
निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण नायबसिंग सैनी हेच मुख्यमंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे. हरियाणाचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार स्थापन झाल्यास सैनी मुख्यमंत्री होतील, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अशा स्थितीत सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे बोलले जात आहे. सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली आहे. लवकरच पक्षाकडून अधिकृत घोषणेची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
हरियाणात मुख्यमंत्र्यासह एकूण 14 मंत्री शपथ घेऊ शकतात. मागील सरकारमधील 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर 3 मंत्र्यांची तिकिटे कापण्यात आली होती. केवळ 2 मंत्र्यांना निवडणूक जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या निकालानंतर सैनी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
सैनी यांच्या मंत्रिमंडळात दलित, अहिर, गुर्जर आणि इतर बिगर जाट ओबीसींबरोबरच ब्राह्मण आणि राजपूतांनीही भाजपच्या बाजूने प्रचंड मतदान केले आहे. अशा स्थितीत या जातींचे राजकीय वर्चस्व सरकारमध्ये दिसून येते. भाजपचे सुमारे 9 दलित आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये दलितांचा सहभाग वाढू शकतो, असे बोलले जात आहे.
नायब सैनी यांच्या मागील सरकारमध्ये 2 मंत्री दलित समाजाचे होते. यावेळी ब्राह्मण आणि राजपूत समाजातील अधिक आमदार विजयी झाले आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळात या समाजांचा सहभागही वाढू शकतो.
2014 मध्ये हरियाणात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले तेव्हा कोणालाही उपमुख्यमंत्री बनवले नाही. 2019 मध्ये, जेजेपीच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केले होते. तेव्हा दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. आता २०२४ मध्ये नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार की नाही यावर सस्पेन्स कायम आहे. मात्र, यूपी, एमपी, राजस्थान या राज्यांमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हरियाणातही उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात.